३५ दिवसांत ४८ लाख+लग्नसोहळे: भारतात लग्नसराईचा धमाका

व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या मते, या लग्नसराईत सुमारे सहा लाख कोटी रुपये बाजारात येण्याची शक्यता आहे.

दिल्ली: भारतात आता लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. आजपासून १६ डिसेंबरपर्यंत ४८ लाखांहून अधिक लग्नसोहळे होणार आहेत. व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या मते, या लग्नसराईत सुमारे सहा लाख कोटी रुपये बाजारात येण्याची शक्यता आहे. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ११ दिवस शुभमुहूर्त होते, तर यावर्षी १८ दिवस शुभमुहूर्त आहेत. त्यामुळे बाजारात अधिक पैसा येईल. १२, १३, १७, १८, २२, २३, २५, २६, २८, २९ नोव्हेंबर आणि ४, ५, ९, १०, ११ डिसेंबर रोजी सर्वाधिक लग्नसोहळे होतील. त्यानंतर २०२५ च्या जानेवारीच्या मध्यापासून लग्नसराई पुन्हा सुरू होऊन मार्चपर्यंत चालेल.

टेक्सटाईल्स, दागिने, घरगुती वस्तू, हॉल, हॉटेल्स, इव्हेंट मॅनेजमेंट, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी अशा अनेक क्षेत्रांना लग्नसराईमुळे उभारी मिळेल, असे CAIT चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले. तीन लाख रुपयांपासून ते एक कोटी किंवा त्याहून अधिक रुपये एका लग्नासाठी खर्च करणारे लोक आहेत.  तीन लाख रुपये खर्च करून होणाऱ्या लग्नांची संख्या सुमारे १० लाखांहून अधिक आहे, तर ५० लाख रुपये खर्च करून होणाऱ्या लग्नांची संख्या ५०,००० पेक्षा जास्त आहे. एक कोटी किंवा त्याहून अधिक खर्च करून होणाऱ्या लग्नांची संख्याही ५०,००० पेक्षा जास्त आहे. 

डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ नव्या पिढीत वाढत आहे. राजस्थान, गोवा, उदयपूर ही भारतातील सर्वात गर्दीची डेस्टिनेशन वेडिंग सेंटर्स आहेत, तर थायलंड, बाली, दुबई ही आंतरराष्ट्रीय हॉटस्पॉट्स आहेत.

Share this article