'आम्ही साधं जीवन जगतो. हा निर्णय योग्य आहे'
८० वर्षांच्या उमा देवी यांच्यासाठी हा नवीन नियम निर्बंधाऐवजी दिलासा देणारा आहे.
त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, "आमच्यापैकी बहुतेक जण गरीब आहेत आणि साधं जीवन जगतात. मला वाटतं की पंचायतीने योग्य निर्णय घेतला आहे."
गावकऱ्यांच्या मते, जड सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड सुमारे दोन दशकांपूर्वी सुरू झाला, जेव्हा गावातील काही पुरुषांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने एक नवीन सामाजिक स्पर्धा सुरू झाली. वधू आणि पाहुणे १८०-२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे सेट घालू लागले, ज्यांची किंमत आता २० लाखांपेक्षा जास्त आहे.
लवकरच, महागडे दागिने प्रतिष्ठेचं प्रतीक बनले आणि ज्यांना ते परवडत नव्हते, त्यांना कमीपणा वाटू लागला.
एका गावकऱ्याने सांगितले, "घरातील महिलांनी किती सोनं घातलं आहे, यावरून लोक कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अंदाज लावू लागले. ही परंपरा न राहता फक्त दिखावा बनली."