भारतीय तटरक्षक दलाची माहिती पाकिस्तानला लीक

पाकिस्तानी एजंटकडून माहिती लीक केल्याबद्दल एकूण ४२,००० रुपये घेतल्याचे आढळून आले आहे.

दिल्ली: भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांच्या हालचालींबद्दलची महत्त्वाची माहिती पाकिस्तानी एजंटला लीक केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ओखा बंदरावर काम करणाऱ्या दिपेश गोहिल याला गुजरात एटीएसने अटक केली आहे. तटरक्षक दलाच्या नौकांबद्दलची माहिती त्याने पाकिस्तानी एजंटला लीक केली आणि त्याबद्दल पैसे घेतल्याचे आढळून आले आहे. 

तटरक्षक दलाच्या नौकांबद्दलची माहिती दिल्याबद्दल दिपेशला दररोज २०० रुपये मिळत होते आणि पाकिस्तानी एजंटकडून त्याने एकूण ४२,००० रुपये घेतल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानी एजंट 'सहिम' या बनावट नावाने ओळखला जात होता, पण त्याची खरी ओळख अस्पष्ट आहे. फेसबुकवर दिपेशशी मैत्री केल्यानंतर, त्याने व्हॉट्सअॅपवरही दिपेशशी संपर्क ठेवला. ओखा बंदरावर असलेल्या तटरक्षक दलाच्या नौकेचे नाव आणि क्रमांक त्याने दिपेशला विचारला होता. 

ओखा येथील एक व्यक्ती तटरक्षक दलाच्या नौकेची माहिती पाकिस्तानच्या नौदलाच्या किंवा आयएसआयच्या एजंटसोबत व्हॉट्सअॅपद्वारे शेअर करत असल्याची माहिती मिळाल्याचे गुजरात एटीएस अधिकारी के. सिद्धार्थ यांनी सांगितले. तपासानंतर ओखा येथील रहिवासी दिपेश गोहिल याला अटक करण्यात आली. दिपेश ज्या नंबरवरून संपर्क साधत होता तो पाकिस्तानातील असल्याचे आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.

ओखा बंदरावरील जहाजांपर्यंत दिपेश सहज पोहोचू शकत होता, असे एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानी एजंटला माहिती दिल्याबद्दल दिपेशला दररोज २०० रुपये मिळत होते. त्याचे बँक खाते नसल्याने, हे पैसे त्याच्या मित्राच्या खात्यात जमा केले जात होते. नंतर वेल्डिंगच्या कामाचे पैसे म्हणून तो हे पैसे मित्राकडून घेत असे. त्याची सखोल चौकशी सुरू असल्याचे एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Share this article