
भारत लवकरच संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळवणार आहे. देशातील पहिले स्वदेशी हायपरसोनिक क्षेपणास्त्र लवकरच सामोरं येणार असून, हे क्षेपणास्त्र माच 5 च्या वेगाने (ध्वनीच्या वेगाच्या पाच पट) उडणार आहे, अशी माहिती DRDO चे माजी प्रमुख डॉ. सुधीर कुमार मिश्रा यांनी दिली.
‘Powering Bharat Summit’ या कार्यक्रमात बोलताना, जो Network18, Moneycontrol, News18 India आणि CNBC Awaaz यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता, डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, "दोन ते तीन आठवड्यांपूर्वी DRDO ने यशस्वी हायपरसोनिक इंजिन चाचणी पूर्ण केली असून, लवकरच हायपरसोनिक क्षेपणास्त्र जगासमोर येणार आहे."
डॉ. मिश्रा यांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, "ब्राह्मोससाठी आवश्यक सर्व तंत्रज्ञान DRDO ने भारतातच विकसित केलं आहे. जगातील सर्वात मोठा लॉन्चर देखील आपण स्वतः तयार केला." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “जेव्हा इतर देश भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालींची तुलना करून ती स्वीकारतात, तेव्हा हेच पुरेसं आहे की आपली प्रणाली सर्वोत्तम आहे.”
याच कार्यक्रमात, Lt Gen (डॉ.) इंदरजित सिंग, जे सध्या ideaForge Technology चे स्ट्रॅटेजिक सल्लागार आहेत, यांनी सांगितले की, "भारत मागील दशकभर ड्रोन तंत्रज्ञानात अग्रेसर राहिला आहे. आज आपण ISR (Intelligence, Surveillance, and Reconnaissance) तंत्रज्ञानात आघाडीवर आहोत." Drone Federation of India चे अध्यक्ष स्मित शाह यांनी 2021 मध्ये लागू झालेल्या ड्रोन धोरणाची भूमिका अधोरेखित केली. "या धोरणामुळे खासगी कंपन्यांना नवकल्पना विकसित करण्याची संधी मिळाली आणि स्वदेशी बौद्धिक संपदा निर्माण झाली."
डॉ. मिश्रा यांच्या मते, ब्राह्मोस ही एक अत्यंत प्रभावी ‘युनिव्हर्सल वेपन सिस्टीम’ आहे, जी इतक्या वेगात आणि ताकदीनं प्रहार करते की तिला अडवणं जवळजवळ अशक्य आहे. ते पुढे म्हणाले, "आतापर्यंत 130 हून अधिक यशस्वी चाचण्या करण्यात आल्या असून प्रत्येक वेळी क्षेपणास्त्राच्या क्षमतेत सुधारणा झाली आहे."
DRDO तंत्रज्ञान विकसित करताना L1 (lowest bidder) पद्धतीऐवजी T1 (best technical offer) निवडते. "कारण संरक्षणात किंमतीपेक्षा कार्यक्षमता महत्त्वाची असते, आणि हीच पद्धत ब्रह्मोस, आकाश, व इतर स्वदेशी तंत्रज्ञानाला यशस्वी बनवते," असं मिश्रा यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले की, "संरक्षण संशोधन व विकास क्षेत्रात गुंतवणूक केल्यानंतर लगेच 2–3 वर्षांत परतावा मिळतो, अशी अपेक्षा चुकीची आहे. खरे संशोधन किमान 10 वर्षं घेतं."
डॉ. मिश्रा यांनी ड्रोन क्षेत्रातील अति-फ्रॅगमेंटेशनवरही चिंता व्यक्त केली. "आज 400 ड्रोन कंपन्या आहेत. पण माझा अंदाज आहे की त्यातील 20 पेक्षा अधिक टिकणार नाहीत," अशी स्पष्टवक्तेपणाने त्यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, "जर प्रत्येक क्षेत्रात 3,000 कंपन्या असतील तर खरेदीदार कोणाला निवडणार? म्हणून समूह बनवा, एकत्र या."
भारत आता फक्त परकीय शस्त्रास्त्रांवर अवलंबून न राहता, अत्याधुनिक आणि घातक शस्त्र प्रणाल्या स्वतः विकसित करत आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या प्रगतीमुळे भारत संरक्षण तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर नेतृत्वाची भूमिका बजावण्याच्या मार्गावर आहे.