
नवी दिल्ली: 'पहिला पुकारा... दुसरा पुकारा... आणि विकली!' अखेर, 'HR88B8888' ही नंबर प्लेट १.१७ कोटी रुपयांना विकली गेली आहे आणि यासह ती भारतातील सर्वात महागडी कार नोंदणी क्रमांक (Costliest Car Registration Number) ठरली आहे. हरियाणात बुधवारी झालेल्या ऑनलाइन लिलावात या नंबर प्लेटने नवा विक्रम रचला.
हरियाणात व्हीआयपी (VIP) किंवा फॅन्सी नंबर प्लेटसाठी दर आठवड्याला ऑनलाइन लिलाव आयोजित केला जातो. इच्छुक बोलीधारक शुक्रवारी संध्याकाळी ५ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांना हवा असलेल्या नंबरसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बोली लावण्याचा खेळ सुरू असतो. हा संपूर्ण लिलाव fancy.parivahan.gov.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन पार पडतो.
या आठवड्यात लिलावासाठी आलेल्या सर्व क्रमांकांमध्ये 'HR88B8888' या नोंदणी क्रमांकासाठी सर्वाधिक अर्ज आले—एकूण ४५ अर्ज. या क्रमांकाची मूळ बोली किंमत (Base Price) केवळ ५०,००० रुपये ठेवण्यात आली होती, पण दर मिनिटाला ती वाढत गेली आणि संध्याकाळी ५ वाजता ती १.१७ कोटी रुपयांवर स्थिरावली. दुपारी १२ वाजेपर्यंतच या क्रमांकाची किंमत ८८ लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. यापूर्वीच्या आठवड्यात 'HR22W2222' या क्रमांकासाठी ३७.९१ लाख रुपयांची विक्रमी बोली लागली होती.
'HR88B8888' हा एक विशिष्ट व्हीआयपी (VIP) क्रमांक आहे, जो प्रीमियम दरात बोली लावून खरेदी केला जातो.
HR: हे राज्य कोड आहे, म्हणजे हे वाहन हरियाणा राज्यात नोंदणीकृत आहे.
88: हा क्रमांक हरियाणातील विशिष्ट प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो.
B: हे त्या विशिष्ट आरटीओमधील वाहन मालिकेचा (Vehicle Series Code) कोड दर्शवते.
8888: हा वाहनाला दिलेला अद्वितीय (Unique) चार अंकी नोंदणी क्रमांक आहे.
हा क्रमांक खास असण्याचं कारण म्हणजे, इंग्रजीतील 'B' हे अक्षर मोठ्या आकारात (Uppercase) लिहिल्यास ते '8' (आठ) अंकासारखे दिसते. त्यामुळे हा संपूर्ण क्रमांक एकाच अंकाच्या '८८८८८८८८' अशा माळेसारखा दिसतो, आणि त्यामुळेच त्याची मागणी आणि किंमत लक्षणीय वाढली.
या वर्षाच्या सुरुवातीला, एप्रिल महिन्यात केरळमधील एका तंत्रज्ञान अब्जाधीश (Tech Billionaire), वेणू गोपालकृष्णन यांनी त्यांच्या लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मांटे (Lamborghini Urus Performante) या सुपरकारसाठी व्हीआयपी नंबर प्लेट खरेदी केली होती. "KL 07 DG 0007" या क्रमांकासाठी त्यांनी ४५.९९ लाख रुपये मोजले होते. २५,००० रुपयांपासून सुरू झालेली ही बोली झपाट्याने वाढत गेली आणि हा केरळमधील विक्रमी आकडा ठरला.
'०००७' हा क्रमांक आयकॉनिक जेम्स बॉन्ड कोडची आठवण करून देतो. या क्रमांकामुळे केरळच्या लक्झरी ऑटोमोबाइल क्षेत्रातील गोपालकृष्णन यांची उपस्थिती अधिक ठळक झाली आहे.