INDIA Bloc Meet : INDIA आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीआधीच मोठी फूट पडल्याचं चित्र आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) केरळमधील निवडणुकीवरून काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे, DMK आणि AAP हे दोन प्रमुख पक्षही बैठकीला हजेरी लावणार नाहीत. यामुळे आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
INDIA Bloc Meet : विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीच्या बैठकीपूर्वीच अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) सरचिटणीस डी. राजा यांनी सोमवारी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. केरळम विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी डाव्या लोकशाही आघाडीवर (LDF) केलेल्या टीकेचा मुद्दा बैठकीत उचलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
INDIA आघाडीकडे अजेंडाच नाही?
डी. राजा यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, 'INDIA' आघाडीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अद्याप बैठकीचा अजेंडा कळवलेला नाही. CPI नेते म्हणाले, "खूप मोठ्या कालावधीनंतर 'INDIA' आघाडीची बैठक होत आहे. DMK वगळता २३ पक्ष यात सहभागी होतील असं दिसतंय. मल्लिकार्जुन खर्गे हे आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यालयातून आम्हाला माहिती मिळते. पण बैठकीचा नेमका अजेंडा किंवा मुद्दे आम्हाला अजूनही माहित नाहीत. डाव्या पक्षांचे स्वतःचे काही मुद्दे आहेत आणि ते आम्ही बैठकीत नक्कीच मांडू."
ते पुढे म्हणाले, "एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केरळम निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी डाव्या पक्षांच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'डाव्या पक्षांचं भाजपसोबत साटंलोटं आहे' असं म्हटलं गेलं. अशा गोष्टी अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. एकमेकांवर विश्वास असायला हवा. जर एकमेकांबद्दल आदर आणि विश्वासच नसेल, तर आपण एकत्र येऊन आंदोलन कसं उभं करणार?"
'देश वाचवा, भाजप हटवा' या उद्देशाने 'INDIA' आघाडीची स्थापना झाली होती. पण देश वाचवण्यासाठी आणि भाजपला हरवण्यासाठी आपण नेमकं काय करत आहोत? यावर आम्ही चर्चा करू, असंही राजा म्हणाले. CPI(M) पक्षानेही केरळम विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या नेतृत्वाविरोधात काँग्रेसने "नियोजनबद्ध मोहीम" राबवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तरीही, पक्षाचे खासदार जॉन ब्रिटास हे 'INDIA' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
#WATCH | दिल्ली: आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा म्हणतात, "डीएमके वगळता २३ पक्ष यात सहभागी होतील असे म्हटले जात आहे. तथापि, नेमके कोणते पक्ष आणि नेते बैठकीला उपस्थित राहत आहेत हे आम्हाला निश्चित करणे आवश्यक आहे. कारण श्री खर्गे हे… pic.twitter.com/VkPJljEvkV
— ANI (@ANI) June 8, 2026
DMK नेही फिरवली पाठ
द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) हा पक्षही या बैठकीत सहभागी होणार नाही. कारण, काँग्रेसने अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेट्री कळघम' (TVK) सोबत हातमिळवणी केल्यामुळे DMK सोबतची जुनी भागीदारी संपुष्टात आणली होती. यामुळे नाराज DMK ने बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
केजरीवालांची 'आप' देखील बैठकीत नाही?
दरम्यान, आम आदमी पार्टीचे (AAP) नेतेही या बैठकीत सहभागी होणार नाहीत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या वर्षीच 'आप'ने 'INDIA' आघाडी सोडली होती. 'आप'चे खासदार संजय सिंह म्हणाले, "आम्ही 'INDIA' आघाडीचा भाग नाही, त्यामुळे 'आप'च्या बैठकीत सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही."
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.