
हैदराबाद - जून 2024 मध्ये, हैदराबादमधील एका जोडप्याला त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी मिळाली. "तुम्ही आईवडिल झाला आहात." सरोगसीद्वारे पालक होण्याच्या स्वप्नासाठी त्यांनी अनेक महिने वाट पाहिली होती. जवळपास ३५ लाख रुपये खर्च केले होते. त्यांच्या मते, ही त्यांची स्वप्नपूर्ती होती. मात्र, ही स्वप्ने काही दिवसांतच अतिव वेदनेत बदलली.
त्यांना मिळालेले बाळ जैविकदृष्ट्या त्यांचे नव्हते. नंतर झालेल्या डीएनए चाचणीने सिद्ध केले की हे बाळ सरोगसीद्वारे जन्मलेले नसून ते आसाममधील एका गरीब कुटुंबाकडून विकत घेतले गेले होते आणि सरोगसीच्या नावाखाली या जोडप्याला दिले गेले होते.
ऑगस्ट 2024 मध्ये हे जोडपे प्रसिद्ध फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. अतलुरी नम्रता यांच्याकडे गेले. त्या युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरच्या संस्थापक असून या क्षेत्रातील नावाजलेली व्यक्ती मानल्या जात होत्या. डॉ. नम्रता यांनी या जोडप्याला आश्वासन दिले की सरोगसीद्वारे बाळ पूर्णपणे त्यांचेच असणार आहे.
जोडप्याने उपचार, सल्ला, सरोगेट आईची काळजी आणि प्रसूती शुल्क यासाठी लाखो रुपये दिले. त्यांना सांगण्यात आले की बाळ विशाखापट्टणम येथे जन्म घेईल. काही महिन्यांनंतर त्यांना एका बाळाचे आगमन झाले. परंतु त्यांना हे माहीत नव्हते की हे बाळ सुरुवातीपासूनच त्यांचे नव्हते.
क्लिनिकने बाळाच्या डीएनएबद्दल कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जोडप्याला शंका आली आणि त्यांनी गुपचूप स्वतः डीएनए चाचणी केली. चाचणीचे निष्कर्ष धक्कादायक होते. बाळाचा या दोघांशी काहीही जैविक संबंध नव्हता.जेव्हा त्यांनी हे डॉक्टरांकडे मांडले, तेव्हा त्यांच्या कॉल्सला उत्तर दिले गेले नाही. उलट धमक्या मिळू लागल्या. त्यामुळे त्यांनी थेट गोपालपुरम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या तपासात उघड झाले की डॉ. नम्रता यांनी एक मोठे बाल तस्करीचे जाळे उभारले होते. त्या फक्त उपचार करत नव्हत्या, तर खोट्या सरोगसीच्या नावाखाली नवजात बाळांचा अवैध विक्रीचा व्यवसाय करत होत्या.
या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यात डॉ. नम्रता यांचा वकील मुलगा, गांधी रुग्णालयातील एक डॉक्टर, एजंट, क्लिनिक कर्मचारी आणि बाळ विकणारे आसाममधील दाम्पत्य मोहम्मद अली आदिक व नसरीन बेगम यांचा समावेश आहे. या दाम्पत्याने अवघ्या ९०,००० रुपयांना बाळ विकल्याचे समोर आले.
२०२१ मध्येच डॉ. नम्रता यांच्या क्लिनिकचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला होता. तरीही त्या हैदराबाद, विजयवाडा व विशाखापट्टणम येथे आपले केंद्र चालवत होत्या. तपासात समोर आले की त्यांच्या क्लिनिकमध्ये अजूनही लिंग निदान, भूल देणे आणि इतर वैद्यकीय प्रक्रिया परवान्याशिवाय सुरू होत्या.रविवारी टाकण्यात आलेल्या छाप्यात आरोग्य अधिकाऱ्यांना असे आढळून आले की रुग्णांना मागच्या दाराने आत आणले जात होते आणि क्लिनिक फसव्या मार्गाने चालवले जात होते.
डीसीपी रश्मी पेरुमल म्हणाल्या, "हे सरोगसी प्रकरण नाही. हे बाल तस्करीचे प्रकरण आहे. या दांपत्याला पालक होण्याच्या आशेने फसवले गेले. आम्हाला अशी अनेक प्रकरणे असल्याची शंका आहे." पोलिस आता या क्लिनिकच्या तिन्ही शाखांतील रेकॉर्ड तपासत आहेत.
२०२१ मध्ये भारत सरकारने व्यावसायिक सरोगसीवर बंदी घातली होती. त्यानंतर केवळ परोपकारी सरोगसीच कायदेशीर मानली जाते. म्हणजे सरोगेट आईला कोणताही आर्थिक मोबदला न देता फक्त वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. मात्र, या कायद्याच्या मर्यादांचा गैरफायदा घेत अनेकांनी बेकायदेशीर रॅकेट चालवण्यास सुरुवात केली आहे.
या सर्व प्रकारात सर्वात मोठा फटका बसतो तो अशा जोडप्यांना जे अपत्याच्या आशेने लाखो रुपये खर्च करून फसवले जातात. या प्रकरणातील हैदराबादचे जोडपे, जे आपले बाळ कवेत घेऊन आनंदी झाले होते, आज कायदेशीर लढाईत अडकले आहे. त्यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे.