भारताला शक्तिशाली आणि नीतिमान बनविण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र आले पाहिजे - मोहन भागवत

Published : May 26, 2025, 09:01 AM IST
RSS chief Mohan Bhagwat

सार

शेजारील राष्ट्रांकडून होणाऱ्या कुरापतींना थांबवण्यासाठी भारताने बळाचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत मोहन भागवत यांनी केले आहे. याशिवाय भागवत यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरही भाष्य केले. 

India : शेजारील राष्ट्रांकडून होणाऱ्या कुरापतींना थांबवण्यासाठी भारताने आता बळाचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. काही देशांमध्ये हिंदू समाजावर अन्याय व छळ होत असून, या अन्यायाला थांबवण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदू समाजाचे ऐक्य राष्ट्रासाठी महत्त्वाचे 
संघ विचारांच्या 'ऑर्गनायझर' आणि 'पांचजन्य' या साप्ताहिकांना दिलेल्या मुलाखतीत सरसंघचालक भागवत यांनी हिंदू समाजाचे ऐक्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. भारत हे हिंदू राष्ट्र आहे, हा संघाचा मूलभूत विचार असून त्याच दिशेने संघाची वाटचाल सुरु आहे. भारताला शक्तिशाली आणि नीतिमान राष्ट्र बनवण्यासाठी हिंदू समाजाने एकसंघ होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

पहलगाम हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'चा संदर्भ
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दिलेल्या लष्करी प्रतिसादाचे भागवत यांनी समर्थन केले. “भारताने सद्गुण आणि शक्ती यांची पूजा केली पाहिजे. चांगुलपणाचे रक्षण करण्यासाठी आणि वाईटाचा नाश करण्यासाठी शक्ती आवश्यक आहे. सध्याच्या घडीला आपल्या सीमांवर दुष्टशक्ती सक्रिय झाल्या आहेत, त्यामुळे शक्तीशाली होण्याशिवाय पर्याय नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

'ऑपरेशन सिंदूर'वरून देशाचा स्वाभिमान उंचावला 
पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या लष्करी कारवाईचं सरसंघचालकांनी स्वागत केलं. या कारवाया भारताच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होत्या, असे ते म्हणाले. या कृतीमुळे संपूर्ण देशाचा आत्मसन्मान आणि मनोबल उंचावले आहे, अशी भावना भागवत यांनी व्यक्त केली.

बांगलादेशमधील हिंदू अत्याचारांवर चिंता 
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, अशा छळापासून हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हिंदू समाज आणि भारत हे एकमेकांशी जोडलेले असून, हिंदू समाजाचे गौरवशाली अस्तित्वच भारताच्या गौरवाला अधिक बळकटी देईल. हिंदू समाज मजबूत झाला, तर कितीही शत्रू शक्ती एकत्र आल्या तरी त्यावर मात करता येईल, असे ते म्हणाले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

IndGo प्रवाशांसाठी 'गुड न्यूज', तक्रार करताच ॲक्शन; मंत्रालयाची 'कंट्रोल रूम' ॲक्टिव्ह!
हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील