
मुंबई : गुवाहाटीच्या कहिलीपारा भागात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी एका महिलेची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्यांनी या महिलेला रस्त्यावरून तब्बल ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ही घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. ही महिला रस्त्यावरून चालत जात असताना दुचाकीवरून दोन तरुण तिच्या जवळ आले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, त्यांनी तिची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने बॅग घट्ट पकडून ठेवली. चोरट्यांनी गाडी न थांबवता तशीच पुढे नेली, ज्यामुळे ती महिला रस्त्यावरून फरफटत गेली. या भयानक झटापटीत महिलेला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. अखेर ते चोरटे तिथून पळून गेले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेची भयानकता स्पष्टपणे दिसून येते. बॅग वाचवण्यासाठी ती महिला जिवाच्या आकांताने संघर्ष करत होती आणि चोरटे तिला निर्दयीपणे फरफटत नेत होते.
🚨#SHOCKING: Woman dragged for several metres by scooter-borne snatchers during morning walk in Guwahati, Assam.
Dramatic visuals of the alleged snatching attempt have surfaced, raising serious concerns over pedestrian safety.
#Guwahati #Assam #CrimeNews https://t.co/lGLvbY4P1f
— upuknews (@upuknews1) October 13, 2026
या घटनेमुळे गुवाहाटी शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांना, विशेषतः महिलांना अशा भुरट्या चोरांचा किती मोठा धोका आहे, हे यातून समोर आले आहे.
सुरुवातीला या घटनेबाबत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे की नाही आणि आरोपींची ओळख पटली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.