Goa Club Fire : गोव्यातील आग लागलेल्या क्लबचे दोन्ही मालक देश सोडून फरार, पोलिसांकडून मोठी कारवाई सुरू

Published : Dec 09, 2025, 08:26 AM IST
Goa Club Fire

सार

Goa Club Fire : गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा हे इंडिगोच्या विमानाने थायलंडला पळून गेले. 

Goa Club Fire : गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा हे अग्निकांडानंतर काही तासांतच देश सोडून पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांनी मुंबईहून इंडिगोच्या 6E 1073 या फ्लाइटने थेट थायलंडमधील फुकेत गाठले. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फ्लाइट 7 डिसेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता उड्डाण केले. अग्निकांडानंतर मालकांनी अचानक गायब होऊन देश सोडल्यामुळे तपासात नाट्यमय वळण आले आहे.

आरोपींच्या ठिकाणांवर धाडी; घरांवर नोटिसा

आगीची घटना घडल्यानंतर तातडीने एफआयआर नोंदवण्यात आला आणि गोवा पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले. तिथे आरोपी सौरभ आणि गौरव यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सर्च ऑपरेशन करण्यात आले. मात्र दोन्ही आरोपी कुठेच सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरांवर कायदेशीर नोटिसा चिकटवून पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचा इशारा दिला. 7 डिसेंबरच्या संध्याकाळी दोघांविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आला, परंतु त्यावेळी ते देशाबाहेर पळून गेल्याचे नंतर स्पष्ट झाले.

न्यायालयीन चौकशीचे आदेश

घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि या भीषण दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदतीची घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

आगीतला भीषण व्हिडिओ समोर

‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये आग लागली तेव्हाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे. रात्री कार्यक्रम सुरू असताना डान्स फ्लोअरवर एक नृत्यांगना परफॉर्म करत होती. त्याचवेळी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या वरच्या भागाला आग लागली आणि काही सेकंदातच डान्स फ्लोअरचे छत पेटले. क्लबचा भटारखाना वरच्या मजल्यावर असल्याने तिथून आग खाली झपाट्याने पसरली. काही क्षणात धुराचा आणि ज्योतींचा भयंकर पसरलेला मारा सुरू झाला, ज्यामुळे 25 जणांनी प्राण गमावले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

8व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारची नवीन अपडेट, कर्मचाऱ्यांमध्ये वाढली उत्सुकता
प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!