
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी भारतातील प्रमुख शहरांमध्ये स्थिर राहिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी होऊनही दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चैन्नई, कोलकाता आणि इतर शहरांमधील ग्राहकांना जुन्याच दराने इंधन खरेदी करावं लागणार आहे. भारतातील सरकारी तेल कंपन्या (OMCs) दररोज सकाळी ६ वाजता डायनॅमिक प्राइसिंग सिस्टीमनुसार दर जाहीर करतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाची किंमत $95.10 प्रति बॅरल झाली आहे, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड $90.66 पर्यंत घसरलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दीर्घकाळ संघर्ष होण्याची शक्यता फेटाळल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव कमी झाला आहे, ज्यामुळे हे भाव उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार असूनही, देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर सुमारे तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात स्थिर आहेत.
देशात शेवटची मोठी दरवाढ २५ मे रोजी झाली होती. त्यावेळी पेट्रोल सुमारे २.७० रुपये प्रति लिटर आणि डिझेल २.८० रुपये प्रति लिटरने महाग झालं होतं. तेव्हापासून, अमेरिका-इराण संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता असूनही, किरकोळ इंधनाचे दर जवळपास सारखेच राहिले आहेत.
| शहर | पेट्रोल (रु/लिटर) | डिझेल (रु/लिटर) |
| दिल्ली | १०२.१२ | ९५.२० |
| मुंबई | १११.२१ | ९७.८३ |
| कोलकाता | ११३.५० | ९९.८२ |
| चेन्नई | १०७.७६ | ९९.५५ |
| बंगळूरु | १११.६८ | ९९.५६ |
| हैदराबाद | ११५.७१ | १०३.८४ |
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर, BOK फायनान्शियल सिक्युरिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष डेनिस किसलर म्हणाले, "सध्याच्या तणावामुळे बाजाराला आधार मिळत राहील, पण अमेरिका आणि इराण दोन्ही देश यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत हे लक्षात ठेवा. शांततेसाठी अधिक चर्चा झाल्यास किमती वेगाने खाली येऊ शकतात."
दरम्यान, शेवरॉनचे सीईओ माईक वर्थ म्हणाले की, जागतिक तेल बाजार आता संतुलनाच्या जवळ पोहोचत आहे, तरीही धोके कायम आहेत. अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनीही नमूद केलं की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांनंतरही पर्शियन आखातातून तेलाची वाहतूक सुरूच आहे.