
एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयासंबंधित समस्या असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर हृदयरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीश नाईक यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. यापूर्वीही माजी पंतप्रधान एम्समध्ये दाखल झाले होते. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी ते तापाच्या तक्रारीमुळे एम्समध्ये दाखल झाले होते. त्यांचा ताप तर बरा झाला होता, पण अशक्तपणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २६ सप्टेंबर १९३२ रोजी डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म झाला होता. ते अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात जन्मले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणातून अनेक मोठ्या कामगिऱ्या केल्या.
१९४८ मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीने पदवी प्राप्त केली. १९७१ मध्ये ते भारत सरकारमध्ये रुजू झाले आणि वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागारही झाले. १९७२ मध्ये त्यांना अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनवण्यात आले. त्यानंतर ते अनेक मोठ्या पदांवर काम करताना दिसले. डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते. या काळात त्यांनी एक व्यापक धोरण लागू केले, ज्याची जगभर प्रशंसा झाली.