
बंगळुरूच्या चिक्काबेगूर भागातील एका पीजीमध्ये (पेईंग गेस्ट) मध्यरात्री एका चोरट्याने हातसफाई केली आहे. मुले आपापल्या रूममध्ये गाढ झोपेत असताना या चोरट्याने १२ मोबाईल फोन आणि ७ लॅपटॉप चोरले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ११ मुलांना आपले महागडे गॅजेट्स आणि इतर वस्तू गायब असल्याचे समजले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.
या बहुमजली इमारतीमधील अनेक रूम्सचे दरवाजे आतून उघडे होते. याच गोष्टीचा फायदा घेत चोरट्याने शांतपणे सर्व गॅजेट्स बॅगेत भरले आणि तिथून पळ काढला.
श्री व्यंकटेश्वरा लक्झरी को-लिव्ह पीजीमध्ये राहणारा २० वर्षीय विद्यार्थी लेनिन याने पोलिसांना माहिती दिली. तो २२ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास झोपायला गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता तो उठला, तेव्हा त्याचा मोबाईल गायब असल्याचे त्याला दिसले.
त्याने स्वतःची आणि शेजारच्या रूम्सची तपासणी केली, तेव्हा इतरही अनेक मुले या चोरीची शिकार झाल्याचे उघड झाले. चोरलेल्या वस्तूंमध्ये मॅकबुक, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि आयफोन यांचा समावेश असून, या सर्व वस्तू ११ मुलांच्या होत्या.
मुलांनी इतरही काही मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याची तक्रार केली आहे. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पीजी व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी इमारतीत शिरलेल्या या चोरट्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरसारखा पेहराव केला होता आणि त्याच्या पाठीवर एक बॅग होती.
पोलिसांनी सांगितले की, नाईट शिफ्टवरून परतणाऱ्या मुलांसाठी पीजीचा एक छोटा गेट रात्री उघडा ठेवला जातो. इमारतीत कोणताही सुरक्षारक्षक नव्हता आणि घटनेच्या वेळी पीजीचा मॅनेजर आपल्या रूममध्ये झोपला होता.
रात्रीच्या वेळी चोरट्याने एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये प्रवेश केला. अनेक दरवाजे आतून उघडे असल्याचे त्याला दिसले. त्याने लॅपटॉप आणि मोबाईल आपल्या बॅगेत भरले, तळमजल्यावर आला आणि इमारतीतून पसार झाला.
माहिती मिळताच बेगूर पोलिसांनी पीजीमध्ये धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, कॅमेऱ्याचा दर्जा खराब असल्याने संशयिताचा चेहरा स्पष्ट दिसू शकला नाही.
शेजारच्या इमारतींमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांमधून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. संशयित तामिळनाडूच्या दिशेने जात असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि त्याला शोधण्यासाठी एक पथक रवाना केले.
सुरुवातीला हा चोरटा होसूर किंवा कृष्णगिरीच्या दिशेने जाईल असा पोलिसांचा अंदाज होता, त्यामुळे त्यांनी त्या मार्गाचा पाठलाग केला. मात्र, बसने प्रवास करणारा हा संशयित थेट चेन्नईच्या दिशेने गेला.
पोलीस पथकाने चेन्नईपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने मरिना बीचजवळील एका मार्केटमध्ये शोधमोहीम राबवली. पण, संशयित पोलिसांना गुंगारा देऊन गर्दीच्या मार्केटमध्ये गायब झाला.
चोरलेले लॅपटॉप आणि मोबाईलचे सुटे भाग करून ते मार्केटमध्ये विकले गेले असावेत, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी नंतर बेगूर पथकाला दिली. या भागात १००० हून अधिक दुकाने असल्याने, चोरलेल्या वस्तू परत मिळवणे कठीण होऊ शकते.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षारक्षक नेमणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल, तर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक ॲक्सेस सिस्टीम बसवून सुरक्षा मजबूत करावी, असा सल्ला पोलिसांनी पीजी मालकाला दिला आहे.