
Diwali 2025 : दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्सवांचा सण. अनेक जण नोकरी किंवा शिक्षणाच्या कारणाने घरापासून दूर राहतात आणि दिवाळीसाठी खास घरी जाण्याची तयारी करतात. नवीन कपडे, गोडधोड पदार्थ आणि भेटवस्तूंसोबत अनेकांना फटाकेही सोबत नेण्याची इच्छा असते. पण ही छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकते.
भारतीय रेल्वेच्या सुरक्षाविभागाने दिवाळीपूर्वीच प्रवाशांना इशारा दिला आहे की, ट्रेनमध्ये फटाके, रॉकेट, स्पार्कलर, पाऊस, बॉम्ब किंवा कोणतेही स्फोटक पदार्थ नेण्यास सक्त मनाई आहे.हे पदार्थ केवळ ज्वलनशील नसून, थोड्याशा दुर्लक्षामुळे संपूर्ण ट्रेनला आग लागू शकते. त्यामुळे शेकडो प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 164 अंतर्गत हा गुन्हा मानला जातो. या कलमानुसार, जर कोणी प्रवासी ट्रेनमध्ये फटाके किंवा कोणतेही स्फोटक पदार्थ घेऊन जाताना आढळला, तर त्याला ₹1000 पर्यंत दंड, 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे, ‘फटाके नेऊन घरात आनंद नेऊया’ या विचाराऐवजी ‘सुरक्षित प्रवासाने सण साजरा करूया’ हा विचार महत्त्वाचा ठरतो.
सणासुदीच्या काळात रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि GRP (Government Railway Police) यांच्याकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जाते. स्टेशनवर बॅग तपासणी, कुत्रे पथक आणि स्कॅनिंग मशीनद्वारे सामानाची तपासणी केली जाते. प्रवाशांना सोशल मीडियावर आणि रेल्वे स्टेशनवरील घोषणांद्वारेही जागरूक केले जात आहे.
दिवाळी म्हणजे आनंद पसरवण्याचा सण, पण सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास हा आनंद दुःखात बदलू शकतो. त्यामुळे प्रवास करताना फटाके सोबत नेऊ नका. घरी गेल्यावर स्थानिक बाजारातून खरेदी करा आणि सण सुरक्षिततेने साजरा करा.