
मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने मोठा दावा केला आहे. CJP चे संस्थापक अभिजित दीपके याने याला "लोकशाहीचा विजय" संबोधत आंदोलन यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पत्र प्रसिद्ध करून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा पाठवल्याची माहिती दिली. प्रधानांनी म्हटले की, या प्रकरणाची जबाबदारी मी सुरुवातीपासून स्वीकारली होती. परिस्थितीपासून कधीही दूर पळालो नाही. तसेच प्रधान यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, चार दशकांहून अधिक काळ ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी कार्यरत आहेत. देशातील तरुणांच्या आकांक्षा आणि न्याय्य अपेक्षांचा ते मनापासून आदर करतात. मजबूत आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था ही सक्षम राष्ट्राचा पाया असल्याचेही त्यांनी म्हटले.
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP संस्थापक अभिजित दीपके याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, "आम्ही करून दाखवले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. हा लोकशाहीचा विजय आहे," असे म्हटले. इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करत त्यांना न्याय मिळाल्याचा दावा केला. तसेच, "दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए," असेही तो म्हणाला.
आंदोलनादरम्यान CJP ने काही महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या होत्या. त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईबद्दल सार्वजनिक माफी मागावी आणि NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटींची आर्थिक मदत द्यावी. या मागण्यांवर कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.