
दिल्लीच्या जंतरमंतरवर एका ट्रान्सजेंडर आंदोलकाला ताब्यात घेताना महिला पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या समजूतदारपणाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून, तणावपूर्ण परिस्थितीतही या महिला अधिकाऱ्याने दाखवलेला शांतपणा आणि 'प्रसंगावधान' पाहून लोक तिची स्तुती करत आहेत.
मीडियाशी बोलत असलेल्या एका आंदोलकाजवळ महिला पोलिसांचं पथक पोहोचलं, तेव्हा ही घटना घडली. या आंदोलकाची जेंडर आयडेंटिटी (लिंग ओळख) सर्वांसमोर विचारण्याऐवजी, एका महिला अधिकाऱ्याने त्यांच्याजवळ जाऊन हळूच विचारणा केली आणि त्यानंतरच त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
सुरुवातीला या आंदोलकाने ताब्यात घेण्यास विरोध केला. "मॅडम, तुम्ही मला ताब्यात घेऊ शकत नाही. मी एक पत्रकार आहे, माझ्याकडे कार्ड आहे," असं ते म्हणाले. त्यावर महिला अधिकाऱ्याने विचारलं, "तुम्हाला महिला पोलीस हवी आहे का?" यावर आंदोलकाने उत्तर दिलं, "मी ट्रान्सजेंडर आहे."
हा व्हायरल व्हिडिओ इथे पाहा:
Chad Delhi Police came, asked his name, whispered “You’ve been detained” then asked “Do you need a male or female police officer?”
Bro panicked so hard he became transgender journalist in seconds 😭 https://t.co/hdnOYreoxP
— Hindutva Vigilant (@Viglnthindutva) October 6, 2026
या संवादानंतर पोलिसांनी त्या आंदोलकाला आंदोलनस्थळावरून बाजूला नेलं.
या छोट्याशा संवादाने इंटरनेटवर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इतक्या संवेदनशील परिस्थितीला अत्यंत हुशारीने हाताळल्याबद्दल नेटकरी या महिला अधिकाऱ्याचं कौतुक करत आहेत. गर्दीसमोर प्रश्न विचारण्याऐवजी खाजगीत विचारण्याच्या तिच्या निर्णयाला लोकांनी 'विचारपूर्वक उचललेलं पाऊल' म्हटलं आहे आणि तिच्या प्रसंगावधानाला दाद दिली आहे.
हा व्हिडिओ मूळतः X (पूर्वीचे ट्विटर) वर @Viglnthindutva या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता आणि बघता बघता त्याला हजारो व्ह्यूज मिळाले. या व्हिडिओसोबत एका युझरने उपहासात्मक कॅप्शन देत लिहिलंय: "चॅड दिल्ली पोलीस आले, नाव विचारलं, हळूच कानात सांगितलं 'तुम्हाला ताब्यात घेतलंय' आणि मग विचारलं 'तुम्हाला पुरुष पोलीस हवाय की महिला?' भाऊ इतका घाबरला की काही सेकंदातच तो ट्रान्सजेंडर पत्रकार बनला."
मात्र, या व्हायरल व्हिडिओमधून त्या आंदोलकाची खरी ओळख, त्यांना का ताब्यात घेण्यात आलं किंवा तिथून नेल्यानंतर पुढे काय झालं, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली. मतदार यादीतील सुधारणा आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही या आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.