
Delhi Terror Plot Doctor Shaheena Sayeeds : दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या डॉ. शाहिना सईदच्या विचित्र वागणुकीबद्दल तिच्या सहकाऱ्यांनी खुलासा केला आहे. फरीदाबादमधील अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेसमधील तिची दिवसाची नोकरी संपल्यानंतर, तिचे खरे काम संध्याकाळी ४ नंतर सुरू होते, असे ती तिच्या सहकाऱ्यांना सांगायची, असं एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे. ती नेहमी तिच्यासोबत एक जपमाळ आणि एक हदीस ठेवायची, असंही तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
शाहिना सईद अनेकदा संस्थेचे नियम न पाळता कोणालाही न सांगता निघून जायची आणि तिची वागणूक विचित्र होती, असं नाव न सांगण्याच्या अटीवर एका सहकाऱ्याने सांगितलं. शाहिनाने यापूर्वी कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये फार्माकोलॉजी विभागाची प्रमुख म्हणून काम केलं होतं. नंतर तिची कन्नौज मेडिकल कॉलेजमध्ये बदली झाली होती, असं गुप्तचर यंत्रणेने सूचित केलं आहे. दरम्यान, आमच्या संस्थेचा लाल किल्ला हल्ल्याशी कोणताही संबंध नाही आणि आम्ही तपासात सहकार्य करू, असं अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेसने स्पष्ट केलं आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला शाहिना सईदची ओळख पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या महिला विंगची प्रमुख म्हणून झाली. २००१ मधील संसद हल्ला आणि २०१९ मधील पुलवामा हल्ल्यामागे असलेल्या जैश-ए-मोहम्मदचाच या विशिष्ट दहशतवादी नेटवर्कमागे हात असल्याचा गुप्तचर यंत्रणेचा निष्कर्ष आहे. लखनऊची रहिवासी असलेल्या शाहिनाला लाल किल्ल्यावर स्फोट होण्याच्या काही तास आधी सोमवारी अटक करण्यात आली.
स्फोटानंतर घाबरलेल्या दहशतवादी गटाचा चौथा सदस्य उमर मोहम्मद याने i20 कार चालवली आणि लाल किल्ल्याजवळ तिचा स्फोट झाला. शाहिना सईदच्या आधी डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. आदिल अहमद राथर यांना अटक करण्यात आली होती. हे सर्व सुशिक्षित व्यावसायिक असल्याचे तपासात समोर आले आहे.
दहशतवाद्यांनी दिल्ली-एनसीआर आणि देशाच्या इतर भागांमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची योजना आखली होती, असं तपास सूत्रांनी सूचित केलं आहे. या योजनेचा भाग म्हणून ३२ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण या सर्व गाड्या बॉम्ब ठेवण्यासाठीच होत्या की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डॉ. शाहिना सईद स्वतः ब्रेझा चालवत होती आणि डॉ. शकील प्रामुख्याने डिझायर वापरत होता, अशी माहिती आहे. शकीलच्या घरातून सुमारे ३,००० किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. बेवारस सापडलेल्या फोर्ड इकोस्पोर्टमध्ये फॉरेन्सिक तपासणीत स्फोटकांचे सूक्ष्म अंश आढळले. i20 बॉम्बमध्ये वापरलेले अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइलसह इतर रसायनं या कारमधून आणली असावीत, असा अंदाज आहे.