CJP Protest : जंतर-मंतरवरील आंदोलन चिघळण्याची भीती; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

Published : Jul 24, 2026, 01:29 PM IST
Cjp protest

सार

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या आहेत.

मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या तणावपूर्ण घटनांनंतर दिल्ली पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या आहेत. 

सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

दिल्ली पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू असेल. सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता सामान्य रजा, अर्जित रजा किंवा इतर नियमित सुट्ट्या मंजूर केल्या जाणार नाहीत. मात्र, केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन परिस्थितीतच सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर रजा दिली जाईल.

प्रशिक्षण आणि अधिकृत कार्यक्रमांवरही निर्बंध

दिल्ली पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत कोणताही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी पोलीस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम किंवा अधिकृत कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही.

आंदोलनादरम्यान तणावाचे वातावरण

सोमवार आणि मंगळवारी आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. या घटनांमध्ये अनेक आंदोलकांसह काही पोलीस कर्मचारीही जखमी झालेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

पाचव्या दिवशीही आंदोलन कायम

आंदोलन सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशीही आंदोलक जंतर-मंतर परिसरात ठिय्या आंदोलनावर कायम आहेत. त्यामुळे पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. अशातच दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, चिदंबरम यांची मागणी
Hoskote Transport Hub: एक्सप्रेसवे, हाय-स्पीड ट्रेन आणि मेट्रो; होसाकोटे बनतंय बंगळुरूचं नवं ट्रान्सपोर्ट गेटवे