
दिल्लीच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी महिलांना नेमका कसा अनुभव येतो? हे जाणून घेण्यासाठी दिल्लीतल्या एका कंटेट क्रिएटरने एक भन्नाट पण धाडसी प्रयोग केला. त्याने चक्क मुलीचा ड्रेस, मेकअप आणि डोक्यावर ओढणी घेऊन रात्रीच्या वेळी स्कूटीवरून शहरात राऊंड मारला. या प्रवासात रस्त्यावरील लोकांनी त्याच्याकडे कसं पाहिलं आणि काय कमेंट्स केल्या, हे सगळं त्याने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं. त्याने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (@bejaintle) शेअर केला आणि बघता बघता तो तुफान व्हायरल झाला. अवघ्या दोन दिवसांत या व्हिडिओला १५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सुरुवातीला हा फक्त एक सोशल एक्सपेरिमेंट होता, पण नंतर तो अनुभव खूपच भयानक ठरला. या क्रिएटरने सांगितलं की, सलग दोन तास लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, जवळ येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचा पाठलागही करत होते. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तो म्हणतो, "दिल्लीत रात्रीच्या वेळी मुली किती सुरक्षित आहेत, हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे."
तो सांगतो की, घरातून बाहेर पडल्या पडल्याच लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. पेट्रोल पंपावर स्कूटीत पेट्रोल भरतानाही लोक त्याच्याकडे एकटक पाहत होते. पुढे त्याने सांगितलं की, दोन मुलांनी आधी त्याच्याकडे पाहिलं आणि नंतर पाठलाग करत त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. प्रवासात एका ठिकाणी तर एका माणसाने थेट त्याच्या जवळ येऊन बोलायलाच सुरुवात केली. शहरात फिरताना हा क्रिएटर हे सगळे प्रसंग कॅमेऱ्यात कैद करत होता.
परिस्थिती तेव्हा जास्तच गंभीर झाली, जेव्हा दोन रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा मुद्दाम त्याच्या स्कूटीसमोर आणल्या. त्याच्या सांगण्यानुसार, एका रिक्षाचालकाने जेव्हा पाहिलं की त्याचे मित्र व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत, तेव्हा त्याने रिक्षा थांबवली. तर दुसरा रिक्षाचालक वारंवार त्याच्या अंगावर रिक्षा घालत होता आणि नंतर तिथून निघून गेला. काही कार चालकांनीही प्रवासात काही अंतर त्याचा पाठलाग केल्याचा दावा त्याने केला आहे.
रस्त्यावर सलग दोन तास फिरल्यानंतर, या क्रिएटरने आपला अनुभव शेअर केला. तो म्हणाला, "गेले दोन तास माझ्यासाठी खूपच किळसवाणे होते. सायकल, बाईक, रिक्षा, कार... प्रत्येकाने माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला." या अनुभवानंतर, रात्रीच्या वेळी एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना किती भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो, याची जाणीव झाल्याचं त्याने शेवटी सांगितलं.
या प्रयोगानंतर सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका युजरने कमेंट केली, "मुलींच्या आयुष्यात हे रोजचंच आहे, अगदी दिवसाढवळ्याही हेच घडतं." तर दुसऱ्या एकाने लिहिलं, "मला वाटतं, प्रत्येक पुरुषाने एकदा तरी स्त्री बनून हा अनुभव घ्यायलाच हवा." या व्हायरल व्हिडिओमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना किती त्रास सहन करावा लागतो, यावर लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत.