Delhi Hotel Fire : दिल्ली हॉटेल जळीतकांडात नवा ट्विस्ट, 'तो' जय मिश्रा आहे तरी कोण? मालकाचा धक्कादायक खुलासा

Published : Jun 04, 2026, 12:17 PM IST
Delhi Hotel Fire : दिल्ली हॉटेल जळीतकांडात नवा ट्विस्ट, 'तो' जय मिश्रा आहे तरी कोण? मालकाचा धक्कादायक खुलासा

सार

Delhi Hotel Fire : दिल्लीतील मालवीय नगर हॉटेल जळीतकांडात २१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मोठा खुलासा झाला आहे. हॉटेल मालक लवकेश बजाजने कबूल केले आहे की, आग लागल्यावर तो मदतीऐवजी घटनास्थळावरून पळून गेला होता. 

Delhi Hotel Fire : दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी 'फ्लोरिश स्टे B&B' हॉटेलला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण राजधानी हादरली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात भारतीय आणि परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी हॉटेल मालक लवकेश बजाजला अटक केली असून, बुधवार रात्री झालेल्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक आणि भयंकर सत्य उघड केली आहेत, ज्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

 

मालकाचा धक्कादायक कबुलीजबाब: “मी भीतीने पळून गेलो”

चौकशीदरम्यान लवकेश बजाजने पोलिसांसमोर जे सांगितलं ते ऐकून तपास अधिकारीही चक्रावले. बजाजने कबूल केलं की, बुधवारी सकाळी जेव्हा हॉटेलमध्ये आग भडकली, तेव्हा तो 'फ्लोरिश स्टे B&B' च्या अगदी जवळच होता. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहिले. पण आत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी किंवा फायर ब्रिगेडला कळवण्याऐवजी, तो भीतीने गुपचूप घटनास्थळावरून पसार झाला. बजाजने सांगितलं की, तो घरीही गेला नाही, उलट पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी तो अनेक तास दिल्लीच्या रस्त्यांवर सैरावैरा भटकत होता.

 

 

सर्वात मोठा खुलासा: फायर सेफ्टी NOC कधीच घेतला नाही!

या प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा तेव्हा झाला, जेव्हा बजाजने कबूल केले की त्याने या इमारतीसाठी कधीही 'फायर सेफ्टी NOC' (अनापत्ति प्रमाणपत्र) घेतलाच नव्हता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या जुन्या इमारतीची रचना अशी होती की तिला सध्याच्या नियमांनुसार कधीच फायर एनओसी मिळू शकली नसती.

मृत्यूचा सापळा: सेन्सर दरवाज्यांमुळे गुदमरला श्वास

तपासात असं समोर आलं आहे की, संपूर्ण इमारतीत येण्या-जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी फक्त एकच अरुंद रस्ता होता. तळमजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमधील इलेक्ट्रिक उपकरणांमुळे आग लागली आणि वरच्या मजल्यांवर पसरली. त्यावेळी हॉटेलच्या खिडक्या पूर्णपणे बंद होत्या आणि मुख्य दरवाजा सेन्सरवर चालत होता. वीज जाताच सेन्सर दरवाजे लॉक झाले, खिडक्यांमुळे धूर बाहेर जाऊ शकला नाही आणि संपूर्ण हॉटेल एका गॅस चेंबरमध्ये बदललं, ज्यामुळे लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

 

 

परवानगी ६ खोल्यांची, पण थाटला होता २५ खोल्यांचा बाजार; बेसमेंटमध्येही मृत्यूचा सापळा

लायसन्सच्या नियमांशी जो खेळ झाला, तो अत्यंत धक्कादायक आहे. दिल्ली सरकारच्या 'बेड अँड ब्रेकफास्ट' (B&B) योजनेअंतर्गत या इमारतीला फक्त ६ खोल्या चालवण्याची कायदेशीर परवानगी होती. पण पैशाच्या हव्यासापोटी बजाज हे हॉटेल २५ खोल्यांसह चालवत होता. कहर म्हणजे, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून बेसमेंटमध्ये (तळघर) सुद्धा खोल्या बनवण्यात आल्या होत्या. आता पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत की, परवानगीशिवाय इमारतीवर आणखी किती मजले बेकायदेशीरपणे चढवण्यात आले होते.

 

 

कोण आहे हा जय मिश्रा? कागदोपत्री 'अकाउंटंट' नावाचा रहस्यमय खेळ

स्वतःला वाचवण्यासाठी लवकेश बजाजने आणखी एक डाव टाकला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तो एकटाच या व्यवसायाचा मालक होता, पण त्याने हॉटेलचा रोजचा कारभार त्याचा अकाउंटंट 'जय मिश्रा' याच्याकडे सोपवला होता. यातील खरी मेख अशी आहे की, हॉटेलच्या कामकाजाशी संबंधित अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे लवकेशच्या नावावर नसून, याच जय मिश्राच्या नावावर नोंदणीकृत आहेत. लायसन्ससुद्धा मिश्राच्या नावावरच काढण्यात आले होते. पोलिसांना संशय आहे की, मिश्राचा फक्त नावापुरता वापर केला जात होता. सध्या जय मिश्रा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

कोर्टात हजेरी आणि दिल्ली सरकारचा 'मेगा क्लीन-अप' ॲक्शन प्लॅन

आरोपी लवकेश बजाजला आज दुपारी २ वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे. दिल्ली पोलीस त्याच्या ३-४ दिवसांच्या रिमांडची मागणी करणार आहेत, जेणेकरून गहाळ झालेली कागदपत्रे हस्तगत करता येतील आणि बजाजच्या मालकीच्या इतर तीन हॉटेल्सच्या गैरकारभाराचीही चौकशी करता येईल. दरम्यान, या भयंकर दुर्घटनेतून जागे झालेल्या दिल्ली सरकारने राजधानीतील बेकायदेशीर हॉटेल्सवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन, एमसीडी (MCD), दिल्ली पोलीस आणि वीज विभाग यांची एक संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी संपूर्ण दिल्लीत तपासणी मोहीम राबवणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला सल्ला, लढू शकत नसाल तर माघार घ्या | Mahayuti | Election
Rain Update : मान्सूनपूर्व देशात हवामानाचा मोठा इशारा; 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका