Delhi Election 2025: दिल्ली निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप जोरदार मेहनत करताना दिसत आहेत. आता आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल लोकांमध्ये पुन्हा अनेक वचने घेऊन आले आहेत. जेणेकरून त्यांच्या पक्षाला पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता मिळवता येईल. अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या १५ हमींची घोषणा करून पुन्हा एकदा दिल्लीकरांचे मन जिंकण्याचे काम केले आहे. यामध्ये त्यांनी महिला, वृद्ध आणि युवकांच्या गरजांचा विचार केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, दिल्लीत आप सरकार आले तर लोकांचे लाखो रुपयांचे बिल माफ केले जातील.
दरम्यान, पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपले मत मांडताना सांगितले की, दिल्लीच्या जनतेशी आमचा संबंध वचनांचा नाही तर हमीचा आहे. ही केजरीवाल यांची हमी आहे. जे सांगितले ते करून दाखवू.