
Delhi Car Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या कार बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली. स्फोटग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतल्याचे मोदी म्हणाले. दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिल्लीला हादरवून सोडणारा कार बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत उच्चस्तरीय सूत्रांनी दिले आहेत. याबाबत येत्या काही तासांत पुष्टी मिळू शकते. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सायंकाळी ६.५५ च्या सुमारास हा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ हळू आलेल्या वाहनाचा ट्रॅफिक सिग्नलवर स्फोट झाला. जवळची वाहनेही उद्ध्वस्त झाल्याचे दिल्ली आयुक्तांनी सांगितले. कारमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दिल्लीत स्फोट झालेले वाहन नवीन असल्याचाही संशय आहे. यासंबंधीचा एक फोटो समोर आला आहे. मात्र, ते नवीन वाहन असल्याची पुष्टी पोलिसांनी केलेली नाही.
दरम्यान, दिल्लीत स्फोट झालेल्या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा पोहोचले. हा स्फोट आय २० कारमध्ये झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. जखमींची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली. सविस्तर तपास सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. एनआयएसह सर्व तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचेही अमित शहा यांनी स्पष्ट केले.
दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या या स्फोटातील मृतांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ हा स्फोट झाला. अनेक वाहनांना आग लागली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळ हा स्फोट झाला. दोन कारचा स्फोट झाल्याचे समजते. या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेजारील राज्यांमध्येही कडक दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.