
अमृतसर येथील एका स्थानिक भाजी मंडईतून विकत घेतलेल्या लोणच्याच्या डब्यात मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सणासुदीच्या काळात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांवर या घटनेमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खळचियान गावातील रहिवासी चरण सिंग यांनी २८ ऑक्टोबर रोजी अमृतसरहून परतताना भाजी मंडईतील एका दुकानातून १ किलो लोणचं विकत घेतलं होतं. घरी आल्यावर कुटुंबाला लोणचं वाढण्यासाठी त्यांनी डबा उघडला, तेव्हा त्यात त्यांना चक्क एक मेलेली पाल दिसली.
दुकानाच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत सिंग यांनी आरोप केला की, उघड्या ड्रममधून कोणत्याही स्वच्छतेशिवाय आणि सुरक्षेशिवाय लोणचं विकलं जात होतं. एका संस्थेच्या मदतीने त्यांनी अधिकाऱ्यांकडे आणि मीडियाकडे धाव घेत ग्राहकांना सतर्क करण्याचं काम केलं. उघड्यावर विकलं जाणारं लोणचं विकत घेऊ नका, असं आवाहनही त्यांनी लोकांना केलं आहे.
या तक्रारीची दखल घेत, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नियुक्त अन्न सुरक्षा अधिकारी मनजीत सिंग यांनी सांगितलं की, दुकानाचा पूर्ण पत्ता मिळाल्यावर एक पथक तिथे जाऊन तपासणी करेल आणि नमुने गोळा करेल.
ते पुढे म्हणाले की, जर हे नमुने असुरक्षित आढळले किंवा अन्न सुरक्षेच्या मानकांची पूर्तता करत नसतील, तर दुकानदारावर दंडासह कायदेशीर कारवाई केली जाईल.
दिवाळीच्या तोंडावर लोक मिठाई, फरसाण, लोणची आणि इतर खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. अशा वेळी या घटनेमुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिक रहिवासी संजीव मेहरा म्हणाले की, या घटनेमुळे अन्न विक्रेत्यांच्या स्वच्छतेवर आणि गुणवत्तेवर ग्राहकांचा जो विश्वास होता, तो उडाला आहे.
उघड्या डब्यांमध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ स्वच्छ वातावरणात ठेवले जातात की नाही, याची खात्री करण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाने तपासणी वाढवण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजी मंडईजवळ राहणाऱ्या काजल शर्मा या गृहिणीने सांगितलं की, त्या अनेक दशकांपासून दुकानदारांना उघड्यावर विविध प्रकारची लोणची विकताना पाहत आहेत. या निष्काळजीपणावर चिंता व्यक्त करत त्या म्हणाल्या, "जर लोणच्याच्या डब्यात मेलेली पाल सापडू शकते, तर तिथे स्वच्छतेचे कोणते नियम पाळले जात असतील, याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी."