
दिल्लीच्या एका कंटेंट क्रिएटरने ५०० रुपयांचं स्टारबक्स ड्रिंक घेतलं, पण त्यात स्ट्रॉबेरीच्या तुकड्याला चिकटलेली एक मेलेली माशी तिला दिसली. तिने याचा व्हिडिओ काढला आणि तो इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल झाला. या प्रकारानंतर स्टारबक्स इंडियाने माफी मागितली असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
शिखा नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुरुवातीला ती स्टारबक्सचा तो ओळखीचा हिरवा स्ट्रॉ असलेला कप हातात धरलेली दिसते. त्यानंतर ड्रिंकमध्ये तरंगणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या तुकड्यावर एक मेलेली माशी अडकल्याचं तिच्या लक्षात येतं.
शिखाने कॅमेरा झूम करून तो किडा स्पष्टपणे दाखवला. एवढ्या मोठ्या ब्रँडच्या आउटलेटमध्ये स्वच्छतेचे कोणते नियम पाळले जातात, असा सवाल तिने उपस्थित केला.
कॅप्शनमध्ये आपला संताप व्यक्त करताना तिने लिहिलं, "तुम्ही ५०० रुपये मोजता आणि तुम्हाला हे मिळतं? कुठे गेली स्वच्छता?"
हे ड्रिंक कोणत्या एअरपोर्टवरून किंवा स्टारबक्सच्या कोणत्या आउटलेटमधून घेतलं, हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही. तसंच, ही घटना नेमकी कधी घडली, हेही शिखाने स्पष्ट केलेलं नाही.
या पोस्टने अल्पावधीतच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ताज्या फळांचा वापर असलेल्या ड्रिंकमध्ये मेलेला किडा कसा काय येऊ शकतो, असा प्रश्न सोशल मीडिया युजर्स विचारत आहेत. एवढे पैसे मोजूनही प्रीमियम कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये अन्नाच्या स्वच्छतेची आणि दर्जाची ही अवस्था असेल, तर कसं व्हायचं, अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली.
काही युजर्सनी तर थेट महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग करत या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. मात्र, अन्न सुरक्षा विभागाने या सोशल मीडिया पोस्टची दखल घेत कोणतीही कारवाई किंवा तपासणी सुरू केल्याची अद्याप माहिती नाही.
स्टारबक्स इंडियाने शिखाच्या पोस्टवर कमेंट करत थेट तिला उत्तर दिलं. या वाईट अनुभवाबद्दल त्यांनी तिची माफी मागितली आणि संपर्क क्रमांक शेअर करण्याची विनंती केली.
"हाय दॅटशीनगर्ल - हे ऐकून आम्हाला वाईट वाटलं. कृपया तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला इनबॉक्स करा. आमची कस्टमर केअर टीम तुमच्याशी संपर्क साधेल," असं स्टारबक्स इंडियाने लिहिलं.
या घटनेनंतर कॉफी चेनने एक अधिकृत निवेदनही जारी केलं. घटना घडली तेव्हा आउटलेटमध्ये याची कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
"टाटा स्टारबक्समध्ये आमचे ग्राहक हीच आमची प्राथमिकता आहे. उपस्थित केलेल्या कोणत्याही समस्येची आम्ही गंभीर दखल घेतो. घटनेच्या वेळी ही बाब स्टोअरच्या निदर्शनास आणून दिली नसली, तरी आमची टीम ग्राहकाच्या संपर्कात आहे आणि सत्यता पडताळण्यासाठी आम्ही चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंतच्या तपासात स्टोअरमध्ये स्वच्छतेची कोणतीही समस्या किंवा प्रक्रियेत त्रुटी आढळलेली नाही. आमच्या ग्राहकांसाठी स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेचे सर्वोच्च निकष पाळण्यासाठी टाटा स्टारबक्स कटिबद्ध आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे.