
DA Hike 2026 : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महागाईच्या वाढत्या ताणात केंद्राने महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ जाहीर केली असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे. याचबरोबर 8व्या वेतन आयोगाबाबतही हालचाली वेगात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. महागाई भत्ता हा जीवनमान खर्च आणि महागाई दर लक्षात घेऊन नियमितपणे सुधारला जातो, त्यामुळे या वाढीचा थेट परिणाम मासिक पगारावर होणार आहे.
महागाई भत्त्याबरोबरच आता 8व्या वेतन आयोगाबाबतही चर्चांना वेग आला आहे. कर्मचारी संघटनांनी वेतन रचनेत मोठे बदल करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यामुळे आगामी काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप पाहायला मिळू शकते.
नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर सध्याचा 18,000 रुपयांचा किमान पगार थेट 69,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तसेच कुटुंबाच्या व्याख्येत आई-वडिलांचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कर्मचारी संघटनांनी केवळ पगारवाढ नव्हे, तर महागाईशी संबंधित इतर भत्त्यांमध्ये वाढ आणि वार्षिक वेतनवाढीचा दर सुधारण्याचीही मागणी केली आहे. यामागे वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्याचा उद्देश आहे.
सध्या २% महागाई भत्ता वाढीमुळे कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा मिळाला असला, तरी 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे भविष्यात मोठ्या आर्थिक बदलांची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आशा आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.