Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचे छत्तीसगडमध्ये अक्राळविक्राळ दृश्य, संपूर्ण आकाश झालं रक्तासारखं लाल!

Published : Oct 30, 2026, 03:51 PM IST
Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचे छत्तीसगडमध्ये अक्राळविक्राळ दृश्य, संपूर्ण आकाश झालं रक्तासारखं लाल!

सार

छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि किरंडुल भागात अर्णब चक्रीवादळामुळे आकाश रक्तासारखं लाल भडक झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जोराच्या वाऱ्यामुळे लोहयुक्त लाल माती हवेत उडाल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

नवी दिल्ली : 'अर्णब' चक्रीवादळाच्या धुमाकूळादरम्यान छत्तीसगडमधील दंतेवाडा (Dantewada) आणि किरंडुल (Kirandul) भागातून एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. येथील आकाश अचानक रक्तासारखं लाल भडक (Blood Red) झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आकाशाचा हा लाल रंग आणि अर्णब चक्रीवादळ यांचा थेट संबंध आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळेच हे घडल्याचं मानलं जात आहे. याआधी ऑस्ट्रेलियासह जगातल्या अनेक भागांत अशीच भीतीदायक आणि प्रलयासारखी दृश्यं पाहायला मिळाली आहेत.

आकाश अचानक लाल का झालं? काय सांगतात शास्त्रज्ञ?

'द न्यू यॉर्क टाइम्स'ने दिलेल्या हवामान तज्ज्ञांच्या अहवालानुसार, जेव्हा एखादं तीव्र चक्रीवादळ धडकतं, तेव्हा त्याचे वेगाने वाहणारे वारे अफाट प्रमाणावर धुळ, वाळू आणि लोहयुक्त लाल माती (Iron-rich red soil) अतिशय उंचावर घेऊन जातात. छत्तीसगडमध्येही अर्णब चक्रीवादळाच्या प्रचंड वाऱ्यांनी ही लाल माती वातावरणात वरच्या थरापर्यंत उडवून दिली. यामुळेच संपूर्ण आकाश अशा प्रकारे लाल रंगाचे दिसू लागले असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याच वर्षी मे महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागातील डेनहॅम शहरात 'नरेल' (Cyclone Narelle) चक्रीवादळ आलं होतं, तेव्हाही असंच दृश्य दिसलं होतं. अमेरिकेच्या 'नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन' (NOAA) च्या उपग्रह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील त्या भागातील मातीत लोहाचं प्रमाण जास्त होतं आणि चक्रीवादळाच्या हवेमुळे ते ऑक्सिडेशन (Oxidation) प्रक्रियेला सामोरे गेले. ही लाल माती वाऱ्यासोबत हवेत वेगाने उडू लागल्याने संपूर्ण आकाश मंगळ ग्रहासारखं गडद लाल दिसू लागलं होतं.

नेटकऱ्यांनी केली 'स्ट्रेंजर थिंग्स'शी तुलना!

छत्तीसगडमधील या विचित्र लाल आकाशाचे व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रसिद्ध नेटफ्लिक्स मालिका 'स्ट्रेंजर थिंग्स' (Stranger Things) मधील सीन्सशी तुलना करत एका युजरने लिहिलं, "हे नक्कीच अपसाइड डाऊनचे दृश्य असावे?" तर दुसऱ्या एकाने "वेकना (Vecna) प्रकट होतोय," अशी मस्करी केली. काही युजर्सनी याला 'इव्हिल डेड' सिनेमाच्या शूटिंग सेटसारखं म्हटलं, तर काहींनी हा धोक्याचा इशारा असून लोकांनी सावध राहावे असा सल्ला दिला.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेल्या 'अर्णब' चक्रीवादळाला 'अत्यंत तीव्र चक्रीवादळ' (Very Severe Cyclonic Storm) म्हणून घोषित करण्यात आलं आहे. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी १३० किलोमीटर इतका प्रचंड होता. आंध्र प्रदेशात या चक्रीवादळामुळे झालेल्या विविध अपघातांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो झाडे उन्मळून पडली असून, पिके आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. मच्छिमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली असून वीज आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. हवामान विभागाने अर्णब चक्रीवादळाचा प्रभाव ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम राहील असा इशारा दिला आहे.

चक्रीवादळग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि मदत साहित्य पुरवण्यासाठी आंध्र प्रदेशपासून ते बिहारपर्यंतच्या सर्व संबंधित राज्य सरकारांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vizhinjam Port: विझिंजम बंदर तज्ज्ञ समितीच्या अहवालावर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Viral Video: इस्तंबूलमध्ये लग्नाच्या शूटदरम्यान नवरी हवेत उडू लागली, महाकाय फुग्यांनी केला घात