पोलिसांनी सांगितले की, दाम्पत्याने चार पानांची सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ मेसेज मागे ठेवला आहे. या दोन्हींमध्ये त्यांनी आपला एकुलता एक मुलगा आदित्य पटेल (21) याच्या मृत्यूच्या दुःखातून सावरू शकत नसल्याचे म्हटले आहे.
2024 मध्ये मस्तूरी पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या रस्ता अपघातात आदित्यचा मृत्यू झाला होता. कृष्णा गवंडीकाम करायचे आणि रमा बाई गृहिणी होत्या. त्यांनी लिहिले की, त्यांचा मुलगाच त्यांचे जग आणि त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता.
आपल्या चिठ्ठीत कृष्णाने आदित्यला 'आमच्या जीवनाचा आधार, आमचे जग... एक आज्ञाधारक मुलगा आणि मित्र' असे म्हटले आहे. त्याने लिहिले की, तो तरुण त्यांच्या घरात हसू आणायचा आणि त्यांची खूप काळजी घ्यायचा.
वडिलांचा पश्चात्ताप आणि कधीही न संपणारं दुःख
कृष्णाने अपघाताच्या दिवसाविषयीही लिहिले आहे. चिठ्ठीनुसार, आदित्य मंदिराच्या कामात आणि यज्ञात मदत करण्यासाठी गावातील पुजाऱ्यासोबत बाहेर गेला होता. कृष्णाने सांगितले की, त्यांचा मुलगा जाण्यास तयार नव्हता, पण त्यांनी देवाचे काम आहे असे सांगून त्याला पाठवले. त्यांनी या निर्णयाला 'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक' म्हटले आहे.
"तो मला कायमचा सोडून गेला," कृष्णाने लिहिले. "आम्ही जिवंत होतो... पण जगत नव्हतो."
गावकऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात हे दाम्पत्य सर्वांपासून दूर झाले होते. ते क्वचितच बोलायचे किंवा हसायचे आणि मुलाच्या मृत्यूनंतर त्यांचे घर शांतच राहिले.