जरांगेंच्या नाशिक रॅलीवरून भुजबळांचा हल्लाबोल, म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमधील शांतता रॅलीवरून छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंकडे आता कोणी लक्ष देत नाही असा दावा भुजबळांनी केला आहे. तसेच, जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात आणि मुख्यमंत्री व्हावे असा टोलाही त्यांनी लगावला.

Rameshwar Gavhane | Published : Aug 18, 2024 8:51 AM IST / Updated: Aug 18 2024, 03:48 PM IST

नाशिक: राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्प्याचीही सांगता झाली आहे. सोलापूरमधून सुरुवात केलेल्या शांतता रॅलीची छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नाशिकमध्ये सांगता झाली. नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला नाशिककरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनीही नाशिककरांचे आभार मानत, चक्क कॉलर ताईट केल्याचं म्हटलं. तसेच, नाशिक हा भुजबळांचा नाही तर मराठ्यांचा बालेकिल्ला असल्याचंही म्हणत भुजबळांना लक्ष्यही केलं होतं. आता, नाशिकच्या जरांगे रॅलीवर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, जरांगेंकडे कोणी लक्ष देत नाहीत, असेही त्यांनी म्हटले.

नाशिकच्या येवला दौऱ्यावर आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगेकडे आता कोणी लक्ष देत नाही. नाशिकच्या सांगता रॅलीला 5 लाख लोक येणार असल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात 8 हजार लोक सहभागी झाले होते, असेही भुजबळ यांनी म्हटले. तर जरांगेंनी 288 जागा लढवाव्या आणि मुख्यमंत्री व्हावे, असा उपरोधात्मक टोलाही लगावला. त्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगे आणि भुजबळ यांच्यातील वाद वाढणार असल्याचे दिसून येते. कारण मनोज जरांगे हेदेखील भुजबळांच्या विधानावर प्रतिक्रिया देतील. दरम्यान 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहायचे की नाही, याचा निर्णय ते घोषित करणार आहेत.

संजय राऊतांवर वन नेशन वन इलेक्शनवरुन केला पलटवार

अजित पवारांना जुन्नरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हे योग्य नाही. महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी एकत्रित काम करण्याचा सल्ला भुजबळांनी येवल्यातील दौऱ्यात दिला आहे. तर खासदार संजय राऊत यांच्या वन नेशन वन इलेक्शन टीकेवरही पलटवार केला आहे. ते मोठी माणसे आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलू, असा टोला भुजबळांनी संजय राऊतांना लगावला. सुरुवातीला सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रपती राजवट होती. त्यामुळे सत्ता स्थापनेला उशीर झाला होता. नोव्हेंबरपर्यंत विधानसभेची मुदत आहे. तिथे उशीर झाला म्हणून इकडे उशीर होतोय. पंतप्रधान मोदी हे सर्व निवडणुका एकत्र घेण्यासाठी आग्रही आहेत. मात्र काही लोकांना टीका टिप्पणी केल्याशिवाय काहीच होत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.

महंत रामगिरी महाराज यांच्या विधानावर व्यक्त केली नाराजी

दरम्यान वादग्रस्त विधान करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रबोधन करतांना दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाचे मन दुखवू नये. हिंदू, मुस्लिम सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहनही यावेळी भुजबळांनी केले.

आणखी वाचा : 

लाडकी बहिण योजनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल, श्रीकांत शिंदेंना म्हटलं 'बेशर्म'

Share this article