नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग 11व्यांदा देशाला संबोधित केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सोहळ्याला उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात विरोधी पक्षनेते असल्याने पहिल्या रांगेत असणं अभिप्रेत असताना राहुल गांधी यांची बैठक व्यवस्था केंद्र सरकारकडून ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत थेट चौथ्या रांगेत करण्यात आली होती. या कृतीवर सोशल मीडियावर सडकून टीका केली जात आहे. सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे. काँग्रेसने सुद्धा राहुल यांच्या बैठक व्यवस्थेवरुन प्रश्न विचारले.
ऑलिम्पिक पदक विजेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुढे बसलेले दिसून आले. ते ज्या रांगेत बसले आहेत, तिथे त्यांच्यासोबत हॉकी संघाचे खेळाडू बसल्याचे दिसून आले. राहुल यांच्या मागे आणखी दोन रांगा आहेत, ज्यात आणखी काही पाहुणे बसले आहेत. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच एखादा विरोधी पक्षनेते लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. अशा स्थितीत त्यांना पाठीमागे बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर सरकारकडून एक निवेदनही समोर आले आहे.
काँग्रेसने सरकारला विचारले प्रश्न
राहुल गांधींना पाठीमागे बसवले जात असल्याबद्दल काँग्रेसने कार्यक्रमातही राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा म्हणाले, "संरक्षण मंत्रालय इतके वाईट का वागत आहे? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसवण्यात आले आहे. विरोधी पक्षनेतेपद आहे. लोकसभेत कोणत्याही केंद्रीय मंत्र्यापेक्षा मोठा, ते पंतप्रधानांनंतर येतात, तुम्ही संरक्षण मंत्रालयाला राष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकारण कसे करू देऊ शकता?
राहुल गांधींच्या बैठकीवर सरकार काय म्हणाले?
त्याचवेळी राहुल गांधी यांच्या बैठक व्यवस्थेवरून सडकून टीका होताच सरकारने खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पुढील रांग ऑलिम्पिक पदक विजेत्यांना द्यावी लागली, त्यामुळे राहुल गांधींना मागील रांगेत बसावे लागले. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करणे आणि त्याच्या बसण्याची योजना करणे ही संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात बसण्याचा प्रोटोकॉल काय आहे?
प्रोटोकॉलनुसार लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला नेहमी पुढच्या रांगेत जागा दिली जाते. यावेळी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, अमित शहा आणि एस जयशंकर समोरच्या रांगेत बसले होते.
आणखी वाचा :
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिरंगा न फडकवणं दु:खद: सुनीता केजरीवाल