
तिरुअनंतपुरम - एफ-३५ लढाऊ विमानाचे आणीबाणीचे लँडिंग: गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. या घटनेची चौकशी सुरू असतानाच शनिवारी रात्री केरळच्या तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्रिटिश लढाऊ विमान एफ-३५ चे आणीबाणीचे लँडिंग झाले.
इंधन कमी झाल्यामुळे हे लढाऊ विमान आणीबाणीने उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदी महासागरात एका युद्धनौकेवर हे एफ-३५ विमान होते. या लढाऊ विमानाने आणीबाणीच्या लँडिंगसाठी परवानगी मागितली. हिंदी महासागरातील युद्धनौकेवरच उतरण्याचा प्रयत्न एफ-३५ करत होते.
समुद्र खवळलेला असल्याने ते शक्य झाले नाही. यामुळेच नव्याने इंधन भरण्यासाठी विमानतळावर उतरण्याची परवानगी विमानाच्या पायलटने मागितली. विमानतळ प्रशासनाने आणीबाणीच्या लँडिंगच्या विनंतीला प्रतिसाद देत सर्व व्यवस्था केली. त्यानंतर शनिवारी रात्री साडे नऊ वाजता हे लढाऊ विमान आणीबाणीने उतरले.