
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा परिसरात वसंत पंचमीच्या दिवशी प्रार्थनेवरून निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढला आहे. न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही प्रार्थनेची परवानगी दिली असून, त्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित केली आहे.
या वर्षी वसंत पंचमी शुक्रवारी आल्याने, परिसरात पूजेची परवानगी मिळावी यासाठी 'हिंदू फ्रंट फॉर जस्टिस' या संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने दोन्ही समुदायांनी शांततेत प्रार्थना करावी आणि कायदा व सुव्यवस्था राखावी, असा आदेश दिला. त्यानुसार, हिंदूंना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रार्थनेची संधी देण्यात आली आहे. तर मुस्लिमांना शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत नमाज पठणासाठी परवानगी दिली आहे.
भारतीय पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या ११व्या शतकातील या वास्तूला हिंदू 'सरस्वती मंदिर' मानतात, तर मुस्लिम 'कमाल मौला मशीद' मानतात. न्यायालयाच्या आदेशानुसार, २००३ पासून भोजशाळा परिसरात मंगळवारी हिंदूंना पूजा करण्याची आणि शुक्रवारी मुस्लिमांना नमाज पठण करण्याची परवानगी आहे.