
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका क्लिनिकल डेटा एक्सपर्टला नुकतीच एका नवीन कंपनीकडून १२७ टक्के पगारवाढीची भन्नाट ऑफर मिळाली आहे. पण त्याची सध्याची कंपनीही त्याला सोडून न जाण्यासाठी तेवढाच पगार देण्याचा विचार करत आहे. यामुळे हा कर्मचारी चांगलाच गोंधळात पडलाय.
नवीन नोकरी पूर्णपणे 'वर्क फ्रॉम होम' आहे. शिवाय, घरी ऑफिस सेटअप करण्यासाठी कंपनी जॉइनिंग बोनसही देणार आहे. पण नवीन ठिकाणी कामाचा ताण जास्त असू शकतो आणि 'वर्क-लाइफ बॅलन्स' बिघडू शकतो, अशी भीती या कर्मचाऱ्याला वाटतेय.
रेडिटवर आपली अडचण मांडताना या कर्मचाऱ्याने सांगितलं की, तो सध्या क्लिनिकल रिसर्च क्षेत्रात फंक्शनल सर्व्हिस प्रोव्हायडर (FSP) मॉडेलवर काम करतोय. "माझी सध्याची कंपनी मला थांबवण्यासाठी नवीन ऑफरइतकाच पगार देण्याचा विचार करत आहे, पण अजून अधिकृत निर्णय झालेला नाही," असं त्याने लिहिलंय. जुन्या कंपनीत थांबायचं म्हणजे ओळखीची टीम, माहिती असलेली कामं आणि कामाचा कमी ताण. पण सध्याच्या मॅनेजरने नोकरी सोडल्यामुळे तिथेही थोडी अनिश्चितता आहे.
"फक्त कम्फर्ट झोनमध्ये राहण्यासाठी जुन्याच कंपनीत थांबणं हा भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय ठरेल का?" असा प्रश्न त्याने विचारलाय. "जर जुन्या कंपनीने पगार वाढवून दिला, तर पैशांसाठी कंपनी बदलण्यात काही अर्थ उरणार नाही. पण फक्त सवय झालीय म्हणून तिथेच राहणं माझ्या करिअरसाठी योग्य आहे का, हे मला समजत नाहीये," असं तो म्हणाला.
रेडिटवर अनेक युजर्सनी त्याला जुन्या कंपनीची 'रिटेन्शन ऑफर' (थांबवण्यासाठी दिलेली ऑफर) नाकारून नवीन कंपनीत जाण्याचा सल्ला दिलाय. एकदा तुम्ही नोकरी सोडणार हे कंपनीला समजलं, की भविष्यात ते तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, असा इशारा काहींनी दिलाय. एका युजरने लिहिलंय, "नोकरी सोडण्याचं सांगितल्यावर कधीच मागे फिरू नका. नवीन कंपनीत तुम्हाला दुप्पट पगार मिळतोय. जुन्या कंपनीला आता तुमची गरज असेल, पण भविष्यात परिस्थिती तशीच राहील याची शाश्वती नाही."
दुसऱ्या एका युजरनेही असंच मत मांडलंय. "सध्याच्या कंपनीने कितीही मोठी ऑफर दिली तरी ती स्वीकारू नका. कंपनी कमी पगारात काम करणारा दुसरा कर्मचारी शोधून तुम्हाला कधीही कामावरून काढू शकते," असा इशारा एकाने दिलाय. "रिटेन्शन ऑफर कधीच घेऊ नका. त्यांनी आधीच कमी पगारात तुमचा रिप्लेसमेंट शोधायला सुरुवात केली असेल. तुम्ही थांबलात आणि त्यांना दुसरा माणूस मिळाला, की ते तुम्हाला काढून टाकतील. त्यापेक्षा नवीन ऑफर स्वीकारा आणि पुढे जा," असा स्पष्ट सल्ला एकाने दिला.
आणखी एका युजरने लिहिलंय, "ती कंपनी सोडून द्या. तुम्हाला दुसरीकडे चांगली ऑफर मिळाली आहे आणि तुम्ही तिथे जाण्यास उत्सुक आहात, हे एकदा जुन्या कंपनीला समजलं की विषय संपला. ते तुम्हाला थांबवण्याचा कितीही प्रयत्न करत असले, तरी संधी मिळताच ते तुम्हाला कामावरून काढतील. त्यामुळे जुनी कंपनी सोडून नवीन आणि चांगला पर्याय निवडणं केव्हाही उत्तम."
डिस्क्लेमर: हा लेख युजर्सनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीवर आधारित आहे. मूळ पोस्टमधील दाव्यांची पुष्टी आम्ही करत नाही.