
चेन्नई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "गेली १५ वर्षे जे चाललंय ते यापुढे खपवून घेतलं जाणार नाही. मोदी आपल्या विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं राहुल गांधी म्हणाले. "आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी गुंडांचा वापर केला जातोय. पण आता मोदी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे दिवस भरले आहेत," असा इशाराही त्यांनी दिला. चेन्नईत आयोजित 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींची तुलना 'मोगॅम्बो'शी केली.
"पेरियार यांनी मोदींना काय संदेश दिला होता? लोकशाहीचा मूळ पायाच प्रश्न विचारण्यात आहे. पण इथे तर मतांची चोरी करून संस्कृतीवर घाला घातला जातोय. भाषा आणि परंपरेत घुसखोरी सुरू आहे," असं राहुल गांधी म्हणाले. मोदी आणि अमित शाह विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेवरच वार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. "ते हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूची संस्कृती नष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे. पण या देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणं कोणा एकालाही शक्य नाही. मोदींना विदेशी शक्ती आणि बडे उद्योगपती चालवत आहेत. पण कायद्याच्या कचाट्यातून त्यांना कोणतीही शक्ती वाचवू शकणार नाही. जोपर्यंत मोदी युग संपवत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही," असा एल्गार राहुल गांधींनी पुकारला.
पंतप्रधान मोदी आंदोलने चिरडून टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "गेल्या काही दिवसांपासून आपण दिल्लीत हेच पाहतोय. रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर आरएसएसचे गुंड आणि मोदीभक्त हल्ले करत आहेत. तिथे इंटरनेटही बंद करण्यात आलं. पण पंतप्रधान असो वा अमित शाह, कोणालाही लोकशाही संपवू देणार नाही. देशाची एकता आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याची ताकद कोणातही नाही. तुमच्याकडे कितीही सत्ता किंवा पैसा असला तरी हे शक्य नाही," असंही राहुल गांधींनी ठणकावून सांगितलं.