
बेंगळुरूच्या ट्रॅफिकबद्दल नेहमीच तक्रारी आणि चर्चा होत असतात, पण नुकताच घडलेला एक प्रकार खूपच वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. शहरातील रस्त्यावर एका रेनॉ क्विड गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या LED स्क्रीनवर एक अत्यंत आक्षेपार्ह मेसेज दाखवला जात होता. एका प्रवाशाने याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री साधारण ९:३० वाजता बेंगळुरूमधील एका ट्रॅफिक जॅममध्ये घडली. व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार त्याच्या पुढच्या गाडीचं चित्रीकरण करताना दिसतो. ही गाडी रेनॉ क्विड असून तिचा नंबर KA 05 MV **** असा आहे. या गाडीच्या मागच्या LED डिस्प्लेवर एक अत्यंत असभ्य आणि अपमानकारक मेसेज लिहिलेला होता.
या विचित्र डिस्प्लेमुळे बाईकस्वाराचं लक्ष वेधलं गेलं. त्याने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्याने बेंगळुरू पोलिसांना टॅग करून या प्रकरणाची दखल घेण्याची आणि योग्य कारवाई करण्याची मागणी केली. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः जिथे लहान मुलं, पादचारी आणि इतर ड्रायव्हर्स असतात, तिथे अशा प्रकारची भाषा वापरण्याबद्दल त्याने चिंता व्यक्त केली.
This car’s LED display shows an extremely vulgar phrase. Is this really where we are heading as a society?
Public obscenity should never be normalised. Abandoning basic manners, mutual respect and empathy will ultimately cost us far more than we realise. pic.twitter.com/VOJ7mqv4sw— Bhavesh Gujrati (@Bhaveshlivelife) September 3, 2026
मोटार वाहन कायद्यानुसार, गाडीवर अशाप्रकारे आफ्टरमार्केट LED डिस्प्ले लावणं बेकायदेशीर ठरू शकतं. विशेषतः जर या बदलाला परवानगी नसेल किंवा त्यामुळे रस्त्यावरील सुरक्षेला धोका निर्माण होत असेल, तर ही एक मोठी समस्या आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम ५२ नुसार गाड्यांमध्ये अशा विशिष्ट बदलांवर बंधनं घालण्यात आली आहेत.
ही बातमी लिहिपर्यंत बेंगळुरू पोलिसांनी या व्हिडिओवर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नव्हती.