अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ११ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे.
अयोध्या: अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ११ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी मान्यवरांसह सामान्य लोकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी झालेल्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होऊ न शकलेल्या ११० मान्यवरांना ट्रस्टने पुन्हा आमंत्रण पाठवले आहे. अंगल टीला येथे जर्मन हँगर टेंट उभारण्यात आला आहे. यामध्ये ५ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मान्यवरांव्यतिरिक्त बहुतेक लोक हे सामान्य नागरिक असतील.
‘गेल्या वर्षी प्राणप्रतिष्ठेत सहभागी होऊ न शकलेल्या सामान्य लोकांना आमंत्रित करण्याचा ट्रस्टने निर्णय घेतला आहे. अंगल टीला येथे तीनही दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना देण्यात येईल. गेल्यावेळी उपस्थित राहू न शकलेले ११० मान्यवर आणि इतर पाहुण्यांनाही आमंत्रण पाठवण्यात आले आहे’ असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे मुख्य सचिव चंपत राय यांनी सांगितले.
मंदिर ट्रस्टच्या मते, यज्ञस्थळी सजावट आणि उत्सवाच्या तयारी अंतिम टप्प्यात आहेत. ११ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिरात रामलल्लाचा अभिषेक करतील. कार्यक्रमाच्या दिवशी मंडप आणि यज्ञशाळेत होणारे शास्त्रीय सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विधी आणि रोजचे रामकथा प्रवचन पाहण्याची संधी सर्वसामान्य लोकांनाही मिळणार आहे.