Assam Flood : आसाममध्ये पुराचा हाहाकार, मृतांचा आकडा ६६ वर; ८१० गावं पाण्याखाली, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Published : Jul 26, 2026, 10:09 AM IST
Assam Flood

सार

Assam Flood Death : आसाममधील पूरस्थिती अत्यंत भीषण आहे. आतापर्यंत पुरात ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. साडेसहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला. अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. NDRF आणि SDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये आलेल्या पुराची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेल्या २४ तासांत आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आता ६६ वर पोहोचला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. ASDMA च्या आपत्ती अहवाल आणि माहिती व्यवस्थापनानुसार, एकूण ६६ मृतांपैकी ६५ जणांचा मृत्यू पुरामुळे, तर एकाचा शहरी भागातील पुरामुळे झाला आहे. नवीन चार मृत्यूंपैकी तीन शिवसागर जिल्ह्यात आणि एक चराईदेव जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत.

१० जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका

२५ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गोलाघाट, चराईदेव, कामरूप, होजाई, दिब्रुगड, शिवसागर, जोरहाट, सोनितपूर, कामरूप (मेट्रो) आणि नागाव या १० जिल्ह्यांतील ६.५४ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. शिवसागर जिल्ह्याची स्थिती सर्वात वाईट असून, येथील २,९०,७७७ नागरिकांचं जीवन विस्कळीत झालं आहे. त्याखालोखाल चराईदेवमध्ये १,८८,४०४ आणि जोरहाटमध्ये १,३१,९४८ लोक प्रभावित झाले आहेत.

रिपोर्टनुसार, २८ महसूल मंडळांमधील ८१० गावं पाण्याखाली गेली आहेत, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या सुमारे ३४,९७०.८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आहे. शहरी पूरस्थितीचा विचार केल्यास, कामरूप आणि कामरूप (मेट्रो) जिल्ह्यांतील दोन महसूल मंडळांमधील ८६ लोकांना फटका बसला आहे. NDRF, SDRF आणि स्थानिक प्रशासनाच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे आणि पूरग्रस्तांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचे काम सुरू आहे. लोकांनी आपली घरं, अनेकांनी आपले नातेवाईक गमावले आहेत.

प्रमुख नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

राज्यातील प्रमुख नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे धोका कायम आहे. केंद्रीय जल आयोगाच्या बुलेटिननुसार, शिवसागरमधील दिखौ नदी आणि नुमालीगढ येथील धनसिरी (दक्षिण) नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

मदत आणि बचावकार्य वेगात

या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने २७४ मदत केंद्रं सुरू केली आहेत, ज्यात ९० मदत छावण्या अर्थात रिलिफ कॅम्प आणि १८४ डिस्ट्रिब्यूशन सेंटरचा समावेश आहे. या छावण्यांमध्ये सध्या १८,९०२ लोकांनी आश्रय घेतला आहे.

पायाभूत सुविधा आणि पशुधनाचे मोठे नुकसान

पुरामुळे राज्यातील पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झालं आहे. शिवसागर, जोरहाट आणि चराईदेवमध्ये १४३ रस्ते खराब झाले आहेत. १० बंधाऱ्यांना फटका बसला असून, एकट्या शिवसागर जिल्ह्यात ७ ठिकाणी बंधारे फुटले आहेत. पशुधनाचीही मोठी हानी झाली असून, ४,५४,०७१ जनावरं प्रभावित झाली आहेत आणि ३,०२१ जनावरं (कोंबड्यांसह) पुरात वाहून गेली आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Amit Shah : भाजप कार्यकर्त्यांसाठी कोणत्याही पदापेक्षा विद्यार्थी, देश महत्त्वाचा; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया
शिक्षण मंत्री म्हणून या नेत्यानं स्वीकारली जबाबदारी, जाणून घ्या माहिती