
Annamalai BJP Exit : तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एकच नाव गाजतंय - के. अन्नामलाई. एकेकाळी भाजपचा 'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे हे माजी IPS अधिकारी लवकरच पक्षाला रामराम ठोकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर अन्नामलाई 'काही दिवसांतच' आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील, हे जवळपास निश्चित झालंय. या बातमीने दिल्लीपासून चेन्नईपर्यंत राजकीय वर्तुळात सस्पेन्स आणि तणाव शिगेला पोहोचला आहे.
अन्नामलाई आणि भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठे मतभेद सुरू होते. खरं तर, अन्नामलाई यांचं स्पष्ट मत होतं की तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) सारख्या प्रादेशिक पक्षांशी लढण्यासाठी भाजपला ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) च्या कुबड्यांची गरज नाही. भाजपने कोणत्याही आघाडीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवावी आणि आपली संघटनात्मक ताकद वाढवावी, असं त्यांना वाटत होतं. याउलट, दिल्लीत बसलेल्या हायकमांडचा DMK ला हरवण्यासाठी AIADMK सोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी करण्यावर जोर होता. हाच वैचारिक संघर्ष दोघांमधील दरीचं मुख्य कारण ठरला.
गेल्या एका वर्षातील घटनाक्रम पाहिला तर अन्नामलाई यांना हळूहळू मुख्य प्रवाहाच्या राजकारणातून बाजूला सारलं जात होतं, हे स्पष्ट दिसतं. याची सुरुवात एप्रिल २०२५ मध्ये झाली, जेव्हा भाजप-AIADMK आघाडीच्या चर्चेदरम्यान अन्नामलाई यांना हटवून नैनार नागेंद्रन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये अन्नामलाई यांनी वडिलांच्या प्रकृतीचं कारण देत निवडणूक प्रभारी पदाचा त्याग केला. आणि उरलीसुरली कसर तेव्हा भरून निघाली, जेव्हा ११ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचं नाव विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतूनही गायब झालं.
अन्नामलाई यांचा ४ जून रोजी येणारा वाढदिवस. त्याआधीच सोमवारी कोयंबतूरच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकाचौकात त्यांच्या समर्थकांनी भलेमोठे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर लिहिलेला नारा - "आमचे नेते, या आणि आमचं नेतृत्व करा" - हे स्पष्टपणे दाखवून देतो की, जमिनीवर त्यांचे चाहते आता एका मोठ्या बदलाची वाट पाहत आहेत. तरुण आणि सोशल मीडियावर जबरदस्त पकड असलेल्या अन्नामलाई यांच्यासाठी त्यांचे समर्थक कोणत्याही थराला जायला तयार दिसत आहेत.
अन्नामलाई लवकरच स्वतःचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करतील, अशा चर्चांनी या सस्पेन्सला आणखी वाढवलं आहे. मात्र, सूत्रांचं म्हणणं आहे की ते लगेचच हा निर्णय घेणार नाहीत, तर योग्य वेळेची वाट पाहतील. केंद्र सरकारच्या त्रि-भाषा धोरणाची वेळेआधी अंमलबजावणी करण्याच्या निर्णयावर अलीकडेच टीका करून अन्नामलाई यांनी हे स्पष्ट केलंय की, ते आता दिल्लीच्या इशाऱ्यावर चालण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता तामिळनाडूच्या द्रविडी राजकारणात हा 'खाकी' वर्दीतील माजी हिरो काय नवीन इतिहास रचतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.