
मुंबई : एअर इंडिया फ्लाइट १७१ दुर्घटनेच्या AAIB अहवालावर एअरलाइन पायलट्स असोसिएशन (ALPA) इंडियाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. असोसिएशनने म्हटले आहे, की चौकशी अधिकारी आधीच पायलट्सना दोषी मानून चौकशी करत आहेत. हा अपवाल पूर्वग्रहदूषित आहे. अहवाल कोणत्याही स्वाक्षरीशिवाय लीक झाला हे संशयास्पद आहे. या अहवालानंतर अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
ALPA चे अध्यक्ष कॅप्टन सॅम थॉमस यांनी अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्हाला असे वाटते की चौकशी ही अशा दिशेने जात आहे की जणू पायलट्सना आधीच दोषी मानले आहे. आम्ही या विचारांचा निषेध करतो.
दुर्घटनाग्रस्त ड्रीमलाइनरचे कॅप्टन सुमित सभरवाल (५६) यांचा एकूण उड्डाण अनुभव १५,६३८ तासांचा होता, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर (३२) यांचा एकूण अनुभव ३,४०३ तासांचा होता. हे दोघे ड्रीमलाइनर ७८७ विमानाचे उड्डाण करत होते. टेकऑफच्या काही सेकंदांनंतरच विमान दुर्घटनाग्रस्त झाले, ज्यात २६० लोकांचा मृत्यू झाला.
AAIB च्या अहवालानुसार, उड्डाण करताच विमानाचे दोन्ही इंजिन RUN वरून CUTOFF मोडमध्ये गेले. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) मध्ये एक पायलट विचारतो, "तू इंधन का बंद केले?" तर दुसरा उत्तर देतो, "मी असे काहीही केले नाही." अहवालात हे स्पष्ट केलेले नाही की हे स्विच मुद्दाम बदलले गेले की चुकून झाले. अहवालात असेही म्हटले आहे की fuel control switch gates च्या सर्व्हिसिंगमध्ये संभाव्य दोष आढळला. ALPA चा प्रश्न आहे की जर अहवाल अद्याप अपूर्ण असेल तर वॉल स्ट्रीट जर्नलसारख्या विदेशी माध्यमांपर्यंत ही माहिती कशी पोहोचली?
ALPA ने मागणी केली आहे की चौकशी प्रक्रियेत अनुभवी वैमानिकांना निरीक्षक म्हणून सामील करावे. असोसिएशनने म्हटले आहे की आम्ही पुन्हा विनंती करतो की पायलट्सच्या प्रतिनिधींना चौकशीत सामील करावे.
नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी निवेदन जारी करून माध्यमांना आणि जनतेला आवाहन केले आहे की अद्याप अंतिम अहवाल आलेला नाही. कृपया निष्कर्ष काढू नका. त्यांनी सांगितले की त्यांना देशातील पायलट्स आणि क्रूवर पूर्ण विश्वास आहे. अंतिम अहवालाची प्रतिक्षा करावी.