निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड मध्ये माओवादीविरोधात मोठी कारवाई ; 29 माओवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगडमधील माओवादग्रस्त भाग कांकेरमध्ये पोलिसांनी चकमकीत 29 माओवादी मारले गेल्याचा दावा केला आहे. या चकमकीत संरक्षण दलाचे तीन जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

देशात 19 एप्रिलच्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्याआधी छत्तीसगडमधील माओवादग्रस्त भाग कांकेरमध्ये पोलिसांनी चकमकीत 29 माओवादी मारले गेले असल्याचे वृत्त समोर आले आहे. या चकमकीत संरक्षण दलाचे तीन जवानही जखमी झाल्याचे देखील सांगण्यात आले. याआधी 18 माओवादी मारले गेल्याचा दावा पोलिसांनी केला होता.त्यानंतर ही कारवाई सुरु होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकेरमधील छोटेबेटिया भागात मंगळवारी 16 एप्रिल रोजी दुपारी संशयित माओवाद्यांशी चकमक झाली. बस्तरमध्ये 19 एप्रिलला लोकसभेचं मतदान आहे आणि माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर ही चकमक झाली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

चकमकीत मारल्या गेलेले शंकर राव आणि ललिता माडवी हे डीवीसी रँकचे नक्षलवादी नेते होते. त्यांच्यावर प्रत्येकी 25-25 लाखांचं इनामही होतं.माओवादी आणि सुरक्षादलांच्या दरम्यान चकमक झाली. आम्ही 29 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. एनसास, कार्बाईन आणि एके 47 सारखी हत्यारं मोठ्या प्रमाणावर जप्त केली आहेत.

कांकेर जिल्ह्यात झालेली चकमक ऐतिहासिक :

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीला ऐतिहासिक म्हटलं आहे. छत्तीसगडच्या नक्षलवाद विरोधी इतिहासातलं हे सर्वांत मोठं यश असल्याचं त्यांनी म्हटलं.मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, माओवादी लोकशाहीवर विश्वास ठेवत नाहीत आणि प्रत्येक लोकशाही प्रक्रियेमध्ये हिंसाचाराने अडथळा आणतात. यावेळीही असंच दिसत होतं. माओवादी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या प्रयत्नात होते.

यावर्षी 50 हुन अधिक माओवादी मारले गेले :

छत्तीसगढमध्ये या महिन्याच्या सुरूवातीलाच 3 एप्रिलला विजापूरमध्ये पोलिसांनी 13 माओवाद्यांना चकमकीत मारल्याचा दावा केला होता. त्यानंतर 6 एप्रिलला बिजापूरमधल्याच पुजारी कांकेरमध्ये पोलिसांनी तीन माओवाद्यांना ठार केलं होतं.केवळ बस्तरमध्येच या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 50 हून अधिक माओवादी मारले गेले आहेत.

 

Share this article