कुंभमेळ्यात गंगेत स्नान करताना २२ वर्षीय तरुण वाहून गेला; NDRF ने वाचवले

गंगेत तरुण बुडताना पाहून NDRF च्या पथकाने तात्काळ नदीत उडी घेत त्याला वाचवले.

लखनौ: महाकुंभमेळ्यात गंगा स्नान करताना २२ वर्षीय तरुण वाहून गेला. गधा माधव घाटावर स्नान करताना तो प्रवाहात अडकला. घटना लक्षात येताच NDRF च्या पथकाने तात्काळ गंगेत उडी घेत तरुणाला वाचवून बाहेर काढले.

'गधा माधव घाटावर गंगेत स्नान करताना २२ वर्षीय भाविक प्रवाहात अडकून बुडू लागला. NDRF च्या बचाव पथकाने तात्काळ नदीत उडी घेत बुडणाऱ्या तरुणाकडे पोहोचले आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले', असे NDRF ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, त्रिवेणी संगमावर ७१ लाख लोकांनी स्नान केले. आजपासून प्रयागराजमध्ये बसंत पंचमी स्नानानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना पुन्हा सुरुवात होईल. पुढील चार दिवसांत गायक हरिहरन यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम होतील. आज (७ फेब्रुवारी) ओडिसी नर्तकी डोना गांगुली, ८ फेब्रुवारी रोजी पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती, ९ फेब्रुवारी रोजी शास्त्रीय नर्तकी सोनाल मानसिंग, गायक सुरेश वाडकर आणि १० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्यासह विविध कलाकार कार्यक्रम सादर करतील.

Share this article