
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच माध्यमांच्या चर्चेत राहत असते. तिने तिच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्लीत उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. ऐश्वर्याने ‘पर्सनॅलिटी राईट्स’च्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती. परवानगीशिवाय फोटो वापरणाऱ्यांच्या विरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ऐश्वर्या रायने आपली प्रतिमा खराब होत असल्याचा दावा केला आहे. तिने म्हटलं आहे की, माझ्या नावाचा आणि फोटोंचा व्यावसायिक वापर परवानगीशिवाय केला जात असल्याची माहिती मिळत असून एका वेबसाइटने कोणतीही परवानगी न घेता आपले फोटो आणि एआय-जनरेटेड फोटो वापरून त्यांचे प्रॉडक्ट्स विकले, ज्यामुळे माझी प्रतिमा खराब होत आहे.
काही अनधिकृत वेबसाइट्स तिच्या नावाचा, फोटोचा आणि ओळखीचा परवानगीशिवाय गैरवापर करत आहेत, हे लक्षात आल्यामुळे ऐश्वर्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. तिने याचिकेतून विनंती केली आहे की, लोकांना माझे नाव, प्रतिमा आणि एआय जनरेटेड पोर्नोग्राफिक कंटेंट कारण्याओपासून रोखावे असं ऐश्वर्याने न्यायालयात सांगितलं आहे.
या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ऐश्वर्याच्या दाव्याला गांभीर्याने घेतले असून संबंधित वेबसाइट्सना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय त्यांचे नाव, फोटो किंवा एआय-जनरेटेड कंटेंट वापरणे हा त्यांच्या मूलभूत अधिकारांचा भंग आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी लवकरच होणार असून यामुळे बॉलिवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण मनोरंजन विश्वात चर्चा रंगली आहे.