बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेनंतर, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्या मुलांसह प्रेमानंद स्वामी आश्रमात भेट देऊन आशीर्वाद घेतले. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हे जोडपे स्वामीजींशी संवाद साधताना दिसत आहे.
मथुरा: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली नेहमीच चर्चेत असतात. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत विराट कोहली अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर विराट कोहली लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या मुलांसह प्रेमानंद स्वामींच्या आश्रमात भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाहून भारतात परतलेले विराट कोहली, आता थेट प्रेमानंद स्वामींच्या आश्रमात भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. विरुष्का जोडप्याने आपल्या मुलांसह आश्रमात भेट दिल्याचा व्हिडिओ प्रेमानंद स्वामीजींनी आपल्या यूट्यूब चॅनेल 'भजन मार्ग'वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रेमानंद स्वामींना प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावर प्रेमानंद स्वामीजींनी शांतपणे उत्तरे दिली आहेत.
प्रेमानंद स्वामीजींना उद्देशून अनुष्का शर्मा म्हणाल्या, 'आम्ही गेल्यावेळी इथे आलो होतो तेव्हा आमच्या मनात अनेक प्रश्न होते. मी ते प्रश्न विचारायचे ठरवले होते. पण आमच्या आधी आलेल्यांनी तेच प्रश्न विचारले होते.' तेव्हा प्रेमानंद स्वामीजी म्हणाले, ‘ईश्वर योग्य ती व्यवस्था करतो.’
पुढे अनुष्का शर्मा म्हणाल्या की, त्या प्रेमानंद स्वामीजींना नेहमी फॉलो करतात. तसेच त्या दररोज स्वामीजींचे सत्संग आणि प्रश्नोत्तरे ऐकतात. दुसऱ्या एका प्रश्नावर प्रेमानंद स्वामीजींनी सराव आणि प्रयत्नाचे महत्त्व उत्तम प्रकारे स्पष्ट केले. सराव करणे चांगले आहे, पण सराव केल्यानंतरही अपयश आले तर आपल्या नशिबात जे लिहिले असेल ते भोगावे लागते, असे प्रेमानंद स्वामीजींनी सांगितले.