
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'रणबाली' हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राहुल सांकृत्यान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. आधी हा चित्रपट ११ सप्टेंबरला रिलीज होणार होता, पण नंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट १६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये धडकणार आहे. नुकताच मेकर्सनी 'रणबाली ट्रुथ २- आपण विसरलेला इतिहास' नावाचा एक खास व्हिडीओ रिलीज केलाय. या व्हिडीओमध्ये चित्रपटाला प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक घटनांबद्दल माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटातल्या पहिल्या गाण्यानेही रेकॉर्ड ब्रेक केलेत. 'एंथय्या सामी' या गाण्याला अवघ्या काही दिवसांत २७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलंय, तर तेलुगू व्हर्जन श्वेता मोहन आणि अजय गोगावले यांनी गायलंय. सर्व भाषांमिळून या गाण्याने आतापर्यंत ३५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.
लग्नानंतर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. मैत्री मुव्ही मेकर्स या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा एक पिरियड ॲक्शन ड्रामा आहे. विजय आणि रश्मिकाची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रणबाली आणि जयम्मा यांच्यातील गाढ प्रेमाची झलक दाखवणारा एक सरप्राईज व्हिडीओही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. चित्रपटाचं टायटल, फर्स्ट ग्लिम्प्स आणि वेडिंग पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. १९ व्या शतकातील खऱ्या ऐतिहासिक घटनांवर हा चित्रपट आधारित आहे.
ब्रिटिश काळात भारतात झालेले, पण इतिहासाच्या पानांवरून गायब असलेले अत्याचार आणि नरसंहार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. हिटलरच्या होलोकॉस्टपेक्षाही भयंकर असा नरसंहार आणि भारताची झालेली आर्थिक लूट यावर चित्रपटाच्या ग्लिम्प्समध्ये भाष्य करण्यात आलंय. सर रिचर्ड टेम्पलसारख्या अधिकाऱ्यांनी भारताला दुष्काळी भाग कसा बनवला, यासारखे भावनिक आणि धक्कादायक सत्य हा चित्रपट उलगडणार आहे.
या चित्रपटात विजय देवरकोंडा 'रणबाली' या योद्ध्याच्या भूमिकेत एकदम डॅशिंग लूकमध्ये दिसणार आहे. तर रश्मिका मंदान्ना 'जयम्मा' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. 'द ममी' या हॉलिवूड चित्रपटामुळे जगभरात प्रसिद्ध झालेले अभिनेते अर्नोल्ड वोस्लू यात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहेत. ते सर थिओडोर हेक्टर या ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. मैत्री मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली नवीन येरनेनी आणि वाय. रविशंकर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर गुलशन कुमार, भूषण कुमार आणि टी-सिरीज हा चित्रपट सादर करत आहेत. हा कोणताही बायोपिक नसून, लपवून ठेवलेले ऐतिहासिक दस्तऐवज आणि तोंडी कथांचं हे सिनेमॅटिक सादरीकरण असल्याचं मेकर्सनी स्पष्ट केलंय. पॅन-इंडिया स्तरावर रिलीज होणारा 'रणबाली' हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या प्रोजेक्ट्सपैकी एक असेल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.