Manoj Kumar Passes Away : हिंदी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Manoj Kumar Passes Away : बॉलिवूडच्या तीन दशकांत अनेक सुपरहिट सिनेमे देणारे जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. भारतकुमार म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मनोज यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. मनोज कुमार डीकंपेंसेट लिव्हर सिरोसिसच्या आजाराचा गेले काही महिने सामना करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मनोज कुमार यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. मनोज कुमार यांनी भले दोन दशकांपूर्वी अखरेचा सिनेमा केला होता पण त्यांचे सिनेमे नेहमीच प्रेक्षक आवर्जुन पहायचे. खरंतर, भारतीय सिनेमांमध्ये मनोज कुमार यांचे योगदान नेहमीच आठवणीत ठेवले जाईल. त्यांना काही प्रतिष्ठित पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले होते. वर्ष 1992 मध्ये मनोज कुमार यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. याशिवाय वर्ष 2015 मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कारही त्यांना दिला होता.
मनोज कुमार यांचे खरे नाव
हिंदी सिनेमात असे काही कलाकार आहेत ज्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर आपले नाव बदलले आहे. याच बदललेल्या नावांनी कलाकारांना ओखळले जाते. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार मनोज कुमार यांनी देखील आपले नाव बदलले होते. त्यांचे चाहते मनोज यांना ‘भारतकुमार’ असे म्हणायचे. खरंतर, मनोज कुमार यांचे खरं नाव हिरिकिशन गिरी गोस्वामी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर ट्विट करत म्हटले की, “दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमार जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते, ज्यांना विशेषतः त्यांच्या देशभक्तीच्या उत्साहासाठी आठवले जात असे, जे त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येत असे. मनोज जी यांच्या कलाकृतींनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली आणि पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. या दुःखाच्या वेळी माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती.”