
Vaishnavi Hagawane Death : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सासरच्या लोकांनी केलेल्या हुंड्यासाठीच्या छळामुळे वैष्णवीने आयुष्य संपवले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात दररोज नवे नवे धक्कादायक खुलासे होत असून, महाराष्ट्र हादरून गेला आहे.
प्रेमविवाहाचं कठोर सत्य; वैष्णवीचा निर्णय तिच्याच जीवावर
वैष्णवीने शशांक हगवणे याच्यासोबत घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. तिच्या आई-वडिलांनी विरोध दर्शवूनही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. “मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे”, असं ती वारंवार म्हणत होती, असं तिच्या मामांनी सांगितलं. "त्या लोकांनी तिच्यावर काय जादूटोणा केला होता, माहीत नाही... पूर्ण संमोहित झाली होती", असा उल्लेखही त्यांनी केला.
थाटामाटात लग्न... पण मागण्या थांबत नव्हत्या
कुटुंबाने अखेर तिच्या इच्छेखातर लग्नास मान्यता दिली. ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी, अशा भरघोस हुंड्यासह विवाह पार पडला. पण तरीही हगवणे कुटुंबाची हाव थांबली नाही. मामांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हुंड्यात एम.जी. हेक्टर गाडी नाकारून फॉर्च्युनरच द्या, असा हट्ट धरला. “माझ्यासोबत भिकारी फिरतात, त्यांच्याकडे गाड्या आहेत, मग मला फॉर्च्युनरच हवी,” अशी मागणी त्यांनी केली होती. १ लाख २० हजारांचे घड्याळ, अधिक सोन्याच्या मागण्या, ही यादी थांबतच नव्हती.
“मामा, माझी चूक झाली...” — वैष्णवीच्या पश्चात्तापाचे दुःखद शब्द
लग्नानंतर काही महिन्यांतच तिचा छळ सुरू झाला. हे ऐकल्यावर मामांनी तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी वैष्णवीने "मामा, माझी चूक झाली...", हे सांगितलं. ती शशांकशी लग्न केल्याचा पश्चात्ताप करत होती. तिच्या चेहऱ्यावर आणि शब्दांत पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता, असं मामांनी सांगितलं.
‘लाडक्या बहिणीला न्याय मिळावा’ – अजित पवारांकडे मागणी
वैष्णवीच्या लग्नावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. त्यांनीच फॉर्च्युनर गाडीची चावी वधू-वरांना दिली होती. त्यावेळी त्यांनी विचारले होते, “गाडी दिली का? त्यांनी मागितली होती का?” हे शब्दच सगळं काही सांगून गेले, असं तिच्या मामांनी स्पष्ट केलं. आज कुटुंबाची एकच मागणी आहे – अजित पवारांनी वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा. हगवणे कुटुंबाने तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं, याला जबाबदार धरून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंब करत आहे.
महिला आयोगाची चौकशी आणि कारवाईचे आदेश
या घटनेची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी स्वतः दखल घेतली आहे. १९ मे २०२५ रोजी त्यांनी पुणे पोलिसांना याप्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादीकडून शशांक हगवणे निलंबित
वैष्णवीच्या पती शशांकला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तातडीने निलंबित करण्यात आलं आहे. त्यांचे वडील पक्षाचे पदाधिकारी नसले तरी, गुन्हेगार कोणताही असो – पाठीशी घातला जाणार नाही, असं चाकणकर यांनी ठणकावून सांगितलं.“गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. पक्ष, नातेवाईक, ओळख बाजूला ठेवून आम्ही न्यायासाठी उभे आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी तक्रार दाखल करून कायदेशीर चौकशी सुरू झाली आहे.