
मराठमोळा अभिनेता सुयश टिळक याने त्याला आलेला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्याला त्याठिकाणी मदत मिळणं अवघड होत. अखेर त्याची गाडी टोईंग करून मुंबईला घेऊन यावं लागलं. आयुष्यात या सहा ते सात तासांच्या प्रवासादरम्यान तो गाडीमध्येच बसून होता आणि त्यानं हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यावेळी गाडी टो होत असताना सुयश टिळक हा गाडीमध्ये बसून होता आणि त्यानं व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात, ज्यांचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो, ही गोष्ट त्याला या घटनेतून शिकायला मिळाली. यावेळी सुयश टिळकने आपलं मत व्यक्त केलं आहे.
‘गाडी न चालवताच सर्वांत लांब ड्राइव्हिंग झाली. माझ्या गाडीचा छोटा अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु माझ्या गाडीचं खूप नुकसान झालं. या अपघातात मला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाही. पण ही घटना अशा ठिकाणी झाली, जिथे मला मदत मिळत नव्हती. मग घरी परतण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग शिल्लक होता.
तो म्हणजे मुंबईला घरापर्यंत माझी गाडी टोईंग करून नेणं. जवळपास तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मला मदत मिळाली. गाडी टो करणाऱ्या ड्राइव्हरने मला माझ्या गाडीतच बसायला सांगितलं. “जर कदाचित गाडीला काही मदत लागली तर..” असं तो म्हणाला. मदत? ती श्वासही घेत नाही, असं यावेळी सुयशने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
‘मला मौन बाळगून माझ्या गाडीत बसावं लागलं. एसी नसलेल्या त्या गाडीतून मला सहा ते सात तास हायवेवरून ओढत नेण्यात आलं. लोक कुतुहलाने माझ्याकडे आणि गाडीकडे बघत होते, काही जण माझ्या नशिबावर हसत होते, तर नेमकं काय झालंय, असा प्रश्न काहींना पडला होता. अशा परिस्थितीत माझा राग अनावर झाला असता, मी चिडू शकलो असतो, मी तक्रारी करत बसू शकलो असतो. परंतु कधी कधी आयुष्य तुम्हाला जे अनुभव देईल, त्याचा फक्त स्वीकार करायचा असतो.’ असं टिळक याने म्हटलं आहे.