
मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कोणत्याही वादामुळे नव्हे, तर त्याच्या 'साखरपुड्याच्या' व्हिडिओमुळे! पण... यात एक भन्नाट ट्विस्ट आहे!
सूरजने नुकताच एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सूटबूटात सजून, कुटुंबीयांसोबत एका मुलीच्या घरी जाताना दिसतो. त्या क्षणी दोघं एकमेकांच्या नजरेत हरवतात, आणि काही क्षणांतच त्यांचा साखरपुडा होतो. "अखेर आनंदाचा दिवस उजाडला..." असं कॅप्शन देत सूरजने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
व्हिडिओ पाहताच चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. पण व्हिडिओच्या शेवटी ट्विस्टने सगळ्यांना थांबवलं कारण तो साखरपुडा खराखुरा नसून सूरजचं एक सुंदर स्वप्न होतं! हा भन्नाट ट्विस्ट पाहून अनेकांनी "अरे देवा!", "भूलभुलैय्या व्हिडिओ!", अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सूरजचा हा विनोदी आणि भावनिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. काही मिनिटांतच व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी "सिनेमॅटिक अंदाजातले प्रेमस्वप्न" अशी दाद दिली आहे.
सूरजने ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. त्यानंतर केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा त्याचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही.
या संपूर्ण ‘साखरपुडा स्वप्नप्रकरणा’नंतर अनेक चाहते सूरजला विचारतायत “ही फेक होती, पण खरी कधी येणार?” सूरजने खरंच लग्नगाठ बांधली तर त्याचं सेलिब्रिटी लग्नसुद्धा चर्चेचा विषय ठरणार, हे नक्की!
सूरज चव्हाण पुन्हा एकदा क्रिएटिव्ह व्हिडिओ आणि अफलातून संकल्पनांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 'बिग बॉस'नंतरही त्याची लोकप्रियता अशीच कायम राहते आहे, हे या व्हिडिओवर मिळणाऱ्या प्रतिसादावरून स्पष्ट होतं.