
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. संपूर्ण देशात भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक होत असताना अनेक बॉलीवुड सेलिब्रिटी या प्रकरणावर मौन बाळगून होते. इंटरनेटवर यावरून बॉलीवुडवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता एका मुलाखतीत लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी मौन सोडले आहे. जाणून घ्या त्यांनी काय म्हटलं आहे?
द लल्लनटॉपच्या मुलाखतीत जावेद अख्तर यांना जेव्हा विचारण्यात आले की बॉलीवुडचे लोक ऑपरेशन सिंदूरसारख्या मुद्द्यावर गप्प का असतात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "मी बोलतो. नेहमी बोलतो. कधीकधी मी जे बोलतो ते लोकांना आवडत नाही, कधीकधी ते त्याच्याशी सहमत असतात. पण मी तेच बोलतो जे मला योग्य वाटते." जावेद अख्तर यांनी यावेळी त्या प्रसिद्ध कलाकारांबद्दलही भाष्य केले जे देशाशी संबंधित मुद्द्यांवरही बोलण्याचे टाळतात. त्यांच्या मते काही लोक राजकीयदृष्ट्या सक्रिय असतात तर काही लोक फक्त कामात रस घेतात. ते म्हणतात, "जर कोणी काही बोलत नसेल तर काय झाले? देश बोलत आहे. अनेक लोक बोलत आहेत. काही पैसे कमविण्यात व्यस्त आहेत किंवा आपले नाव कमावण्यात. सोडा त्यांना."
जावेद अख्तर यांनी यावेळी अलीकडेच झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाचे स्मरण केले, जिथे त्यांना विचारण्यात आले होते की राष्ट्रवादी चित्रपट बनवूनही बॉलीवुड ऑपरेशन सिंदूरवर गप्प का आहे? जावेद यांच्या मते, "मी त्यांना सांगितले की जर तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर खुल्या मनाने बोलता तर सांगा गेल्या १५ वर्षांत तुम्ही सरकारच्या कोणत्या धोरणाचा विरोध केला आहे." निवडक आक्रोशाला आव्हान देताना जावेद अख्तर म्हणाले, "सोप्या किंवा हलक्या विषयांवर सर्वजण बोलू शकतात. पण जे इतरांवर आरोप करतात त्यांनी गंभीर आणि कठीण मुद्द्यांवरही बोलण्याचे धाडस दाखवावे. जिथे विषय सोपा आहे तिथे बोलणे सोपे आहे. जिथे धोका आहे तिथे बोलून दाखवा."