प्राची पिसाटच्या स्क्रिनशॉटवर सुदेश म्हशीलकरांनी सोडलं मौन, म्हणाले...

Published : May 30, 2025, 01:38 PM ISTUpdated : May 30, 2025, 02:26 PM IST
prachi pisat in sudesh mhashilkar

सार

अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर एक फेसबुक चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर मराठी मनोरंजनसृष्टीत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावरच आता सुदेश म्हशिलकरांनी मौन सोडलं आहे. 

Sudesh Mhashilkar On Prachi Pisat : अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर एक फेसबुक चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर मराठी मनोरंजनसृष्टीत मोठा गदारोळ निर्माण झाला. या चॅटमध्ये ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्या अकाउंटवरून पाठवले गेलेले मेसेज होते, जसे की – "हल्ली खूप सेक्सी दिसायला लागलीयस..." किंवा "तुझा नंबर पाठव ना... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय..." हे मेसेजेस समोर आल्यानंतर सुदेश म्हशिलकर यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेकांनी या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या वादानंतर अखेर सुदेश म्हशिलकर यांनी मौन सोडत फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे. त्यांनी प्राचीसोबतच्या चॅटचा पूर्ण स्क्रीनशॉट शेअर करत, फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. या प्रकाराबाबत त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे आणि त्या तक्रारीची प्रतही त्यांनी पोस्टसोबत जोडली आहे.

सुदेश म्हशिलकर यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, "मी सुरुवातीला या प्रकरणावर काहीही बोलणार नव्हतो. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु असलेले चर्चासत्र, लोकांचे व मीडियाचे प्रतिसाद पाहून मौन राखणं अशक्य झालं. त्यामुळे आज माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडतो." त्यांनी प्रथम स्पष्ट केलं की, हा मेसेज त्यांच्या अकाउंटवरून गेला असला तरी तो नेमका केव्हा आणि कसा गेला, हे त्यांना माहिती नाही. त्यांच्या अकाउंटमध्ये कोणीतरी शिरलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केला आणि सोशल मीडिया अकाउंटमध्ये परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हेही त्यांनी अधोरेखित केलं.

दुसऱ्या मुद्द्यात त्यांनी स्पष्टीकरण दिलं की, मूळ चॅटमध्ये हास्यविनोदाच्या स्वरात संवाद होता, आणि कोणताही आक्षेपार्ह हेतू त्यामागे नव्हता. "जर खरंच मी अश्लील मेसेज पाठवला असता, तर त्यावर तात्काळ प्रतिक्रिया उमटली असती," असं त्यांनी म्हटलं. तिसऱ्या मुद्द्यात त्यांनी सांगितलं की, प्राचीचा नंबर त्यांच्या फोनमध्ये आधीपासून सेव्ह होता, त्यामुळे फेसबुकवरून नंबर मागण्याची गरजच नव्हती. त्यांनी तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळाला नाही. चौथ्या मुद्द्यात त्यांनी उत्तर देण्यास विलंब का झाला याबाबत सांगितले की, ते फारसे सोशल मीडियावर सक्रिय नसतात, आणि सध्या त्यांच्या पत्नी कॅन्सरशी झुंज देत असल्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली आहे.

पाचव्या मुद्द्यात त्यांनी स्पष्ट केलं की, प्राचीला धमकावण्याचा आरोप खोटा आहे. काही मित्रांनी काळजीपोटी तिला संपर्क केला असेल, पण स्वतःने कोणालाही तसे करण्यास सांगितलेले नाही. सहाव्या मुद्द्यात, इतर महिलांना धमकावण्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. त्यांनी लिहिलं की, त्यांच्या मैत्रिणी अजूनही त्यांच्या घरी येतात, त्यांच्या पत्नीला ओळखतात, आणि प्रेमाने त्यांच्या हातचं जेवण करतात.

पोस्टच्या शेवटी त्यांनी म्हटलं, "प्रतिष्ठा ही काचेसारखी असते – पारदर्शक पण नाजूक. कोणी एक दगड फेकतो आणि आरसा मोडतो. आज मी तो क्षण अनुभवतोय... आणि शांतपणे पाहतोय. जर हे सगळं केवळ माझी बदनामी करण्यासाठी केलं जात असेल, तर ते अत्यंत खेदजनक आहे. मी हा विषय इथे संपवतो आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचे मनापासून आभार."

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील जबाबदारी आणि व्यक्तिगत गोपनीयतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यानंतर हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!