
Shiv Thakare Wedding : ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेला आणि ‘आपला माणूस’ अशी ओळख निर्माण केलेला अभिनेता शिव ठाकरे याने चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे. शिव ठाकरेने गुपचूप लग्न उरकल्याची माहिती स्वतःच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमधून समोर आली आहे. विवाहसोहळ्यातील फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना थेट गुडन्यूज दिली आहे.
शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वात त्याची आणि अभिनेत्री वीणा जगतापची जोडी विशेष गाजली होती. घरात असतानाच दोघांमध्ये प्रेम फुलले होते आणि ही जोडी चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली होती. वीणा जगतापने हातावर ‘शिव’ नावाचा टॅटू काढून आपल्या प्रेमाची कबुली दिल्याने त्यांची जोडी आणखी चर्चेत आली होती.
मात्र काही कारणांमुळे शिव आणि वीणाचं नातं पुढे टिकू शकलं नाही. दोघे विभक्त झाल्याची बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. बिग बॉसच्या इतिहासातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेली ही जोडी तुटल्याने सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली होती.
‘बिग बॉस मराठी’नंतर शिव ठाकरेने ‘बिग बॉस 16’मध्येही सहभाग घेतला. या पर्वात एका तरुणीने थेट शिवला लग्नासाठी प्रपोज करत प्रेमपत्र दिल्याचा प्रसंग चर्चेत आला होता. दरम्यान, गेल्या काही काळापासून शिव ठाकरेच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होत्या. त्याच्या आईनेही अनेकदा मुलाखतींमध्ये अमरावतीच्या मुलीशी शिवने लग्न करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती.
शिव ठाकरेने काही काळ लग्नापेक्षा आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट केलं होतं. एका मुलाखतीत त्याने लग्नाची भीती वाटते, असंही प्रांजळपणे सांगितलं होतं. मात्र आता 2026 च्या सुरुवातीलाच शिवने गुपचूप विवाह करत आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.
शिव ठाकरेने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने आपल्या पत्नीचा चेहरा मात्र लपवून ठेवला आहे. फोटोला त्याने केवळ “Finally ❤️” असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, ‘भावी वहिनी कोण?’ याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.